मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केले आहेत. याबाबत धनंजय मुंडे यांनी काल (12 जानेवारी) फेसबुकवर संबंधित महिलेने केलेले आरोप ब्लॅकमेलिंग करणारे आणि खोटे आहेत, असे सांगत करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अहमदनगर येथील एका कार्यक्रमानंतर जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
याचबरोबर, याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हायकोर्टात देखील यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. अंतर्गत कुटुंबातील बाब आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावरही आरोप झाले. या प्रकरणाचा खुलासा झाला. यात काही अर्थ नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोहोचणे योग्य नाही. धनंजय मुंडे यांच्याबाबतही चौकशी होईल, खुलासा होईल. त्यांनी जो खुलासा केला तो समोर आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. १३) अहमदनगरमध्ये आयोजित जयंती महोत्सवात जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी, २०२३-२०२४ पर्यंत अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे सगळे काम पूर्ण होईल. पाणी महत्त्वाचे आहे, ते आले पाहिजे हा आग्रह सहकार महर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांचा होता. निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर संगमनेर तालुक्यात उसाचे क्षेत्र अजूनही वाढणार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.