Maharashtra Assembly Election 2024: जिंतूर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजपाने पुन्हा एकदा रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विजय भांबळे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. गेल्यावेळी म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदलून गेले आहे. दोन मोठ्या पक्षाची झालेली दोन शकले आणि तीन-तीन पक्षांच्या दोन आघाड्या, छोटे पक्ष, इतर आघाड्या असे चित्र यावेळी बघायला मिळत आहे. या सगळ्या गोष्टी जिंतूर विधानसभा निवडणुकतही महत्त्वाच्या ठरणार आहेत. पण, २०१९ नंतर मतदारसंघातील राजकीय चित्र बदललं आहे का? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांच्यातच खरी लढत असणार आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असताना विजय भांबळे यांनी जिंतूरमधून १ लाख ६ हजार ९१२ मते घेत विरोधी उमेदवाराचा २७ हजार मतांनी पराभव केला होता.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदलल्याचे दिसले. भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी विजय भांबळे यांचा पराभव केला. भांबळे आणि बोर्डीकर यांच्यात मतांमधील फरक फार नव्हता. मेघना बोर्डीकर यांना १,१६,९१३ मते मिळाली होती. तर विजय भांबळे यांना १,१३,१९६ मते मिळाली होती. बोर्डीकर यांनी ३,७१७ मतांनी भांबळेंचा पराभव केला होता.
लोकसभा निवडणुकीत जिंतूर मतदारसंघात कोणाला मताधिक्य?
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुकीत महाविकास आघाडीचे पारडं जड ठरलं. विधानसभा निवडणुकीत लाखांहून अधिक मते घेणाऱ्या मेघना बोर्डीकर यांना लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देता आले नाही. महत्त्वाचे म्हणजे या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला भरपूर मतदान झाले.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला ८७,८५५ मते मिळाली होती. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला १,००,५०० मते मिळाली होती. यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला १४,८६७ मते मिळाली होती.
लोकसभेनंतर काही महिन्यांनीच आता विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीतही जरांगे फॅक्टर मराठवाड्यात निर्णायक ठरण्याचे अंदाज व्यक्त केले जात आहे. जरांगे फॅक्टर, अपक्ष उमेदवार, बंडखोरी आणि वंचित बहुजन आघाडी हे फॅक्टर मतदारसंघाचा निकाल ठरवण्यात महत्त्वाचे ठरणार आहेत.