लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh election) तयारीने वेग घेतला आहे. काँग्रेस सुस्त पडलेली असताना भाजपाने मुख्यमंत्र्यांपासून आमदारांच्या कामाचा आढावा आणि मतदारसंघातील वातावरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर आज भाजपानेकाँग्रेसला जोरदार झटका देण्याची मोठी तयारी केली आहे. काँग्रेसचा (Congress) मोठा चेहरा असलेले जितिन प्रसाद थोड्याच वेळात भाजपात प्रवेश करणार आहेत. प्रसाद केंद्रीय़ मंत्री पीयूष गोयल (Piyush goyal) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. (Major Jolt To Congress, G23 Dissenter Jitin Prasada To Join BJP Today)
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. भाजप मुख्यालयात जोरदार तयारी सुरू आहे.
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. राजकीय दृष्ट्या उत्तर प्रदेश हे देशातील एक अत्यंत महत्वाचे राज्य आहे. भाजप येथील निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. आशातच काँग्रेसच्या या मोठ्या नेत्याचा भाजप प्रवेश म्हणजे, काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
अनिल बलूनी यांनी एक ट्विट केले....भाजपाचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते अनिल बलूनी यांनी बुधवारी सकाळी एक ट्विट केले आणि राजकीय चर्चांना उधान आले. त्यांनी आज एक मोठा नेता दुपारी 1 वाजता भाजपा मुख्यालयात पक्षप्रवेश करणार आहे. जितीन प्रसाद यांनी देखील 5 जूनला याचे संकेत दिले होते. योगी आदित्यनाथांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, याकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही.