जितिन प्रसाद काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल, पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 06:34 AM2021-06-10T06:34:50+5:302021-06-10T06:35:20+5:30

Jitin Prasada : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि भाजपचे खासदार अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांना बुधवारी भाजपचे सदस्यत्व देण्यात आले. जितिन प्रसाद यांना पक्षात सामील करून घेऊन भाजपने ब्राह्मण मतदारांना विशेष संदेश दिल्याचे मानले जाते.

Jitin Prasada leaves Congress and joins BJP, joins party in the presence of Piyush Goyal | जितिन प्रसाद काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल, पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

जितिन प्रसाद काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल, पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Next

- नितीन अग्रवाल / शीलेश शर्मा

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे युवा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद भाजपमध्ये सामील झाले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मागच्या वर्षी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्र लिहून संघटनात्मक निवडणूक घेण्याची मागणी करणाऱ्या २३ नेत्यांमध्ये जितिन प्रसाद यांचाही समावेश होता. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि भाजपचे खासदार अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांना बुधवारी भाजपचे सदस्यत्व देण्यात आले. जितिन प्रसाद यांना पक्षात सामील करून घेऊन भाजपने ब्राह्मण मतदारांना विशेष संदेश दिल्याचे मानले जाते.

जितिन प्रसाद म्हणाले की, काँग्रेसमध्ये राहून जनतेच्या हिताचे रक्षण करणे शक्य नव्हते. आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कुशल आणि खंबीर नेतृत्वाची आणि भाजपसारख्या मोठ्या संघटनेची गरज आहे. भाजपच खऱ्या अर्थाने देशातील एकमेव राजकीय पक्ष होय. आजपासून माझ्या राजकीय जीवनाचा नवीन अध्याय सुरू होत आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर भाजपमध्ये सामील होणारे जितिन प्रसाद हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले दुसरे नेते आहेत. जितिन प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद (शाहजहाँपूर, उत्तर प्रदेश) यांचे पुत्र आहेत. राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांचे निकटवर्तीय असलेले जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्याविरुद्ध काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही लढविली होती.

जितिन प्रसाद हे २००४ मध्ये शाहजहाँपूर आणि २००९ मध्ये धौरहर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये ते युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री व नंतर पोलाद, मार्ग परिवहन आणि महामार्ग राज्यमंत्री होते. २०११-१२ पर्यंत पेट्रोलियम आणि २०१२-१४ पर्यंत मनुष्यबळ विकास राज्यमंत्री होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.

पुढचे लक्ष्य पायलट
- उच्चपदस्थ सूत्रांनुसार मोदी-शहा जोडी काँग्रेसमधून नेते आणण्यासाठी काँग्रेसमध्ये बंड करून भाजपमध्ये आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचा उपयोग करीत आहे. 
- सूत्रांनी दावा केला की, जितीन प्रसाद यांच्यानंतर शिंदे यांच्याकडे सचिन पायलट यांना पक्षात आणण्याचे काम दिले गेले आहे. 
- काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदे पायलट यांच्याशी सतत बोलत आहेत. परंतु, आमदारांचे गणित पायलट यांच्याकडे नसल्यामुळे शिंदे यांची योजना अधांतरी आहे.

Web Title: Jitin Prasada leaves Congress and joins BJP, joins party in the presence of Piyush Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.