मनमोहन सिंगांना काळे झेंडे दाखवणारा 14 वर्षांनंतर बनला राहुल गांधींचा सल्लागार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 05:47 PM2019-03-31T17:47:19+5:302019-03-31T17:49:45+5:30
मनमोहन सिंग सरकारच्या काळात त्यांना अनेकांनी काळे झेंडे दाखवले होते.
नवी दिल्ली- मनमोहन सिंग सरकारच्या काळात त्यांना अनेकांनी काळे झेंडे दाखवले होते. विशेष म्हणजे त्यावेळी मनमोहन सिंगांना काळे झेंडे दाखवणारी व्यक्ती आज 14 वर्षांनंतर राहुल गांधींची सल्लागार झाली आहे. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे माजी छात्र संघाचे अध्यक्ष संदीप सिंह यांनी डाव्यांची साथ सोडून काँग्रेसमध्ये समावेश केला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून ते राहुल गांधी यांच्याबरोबर आहेत. खरं तर ते राहुल गांधींचे सल्लागार असल्याचीही चर्चा आहे. राहुल गांधींसाठी ते भाषण लिहित असल्याचंही बोललं जातंय. राज्यांतील छोट्या छोट्या पक्षांशी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी संदीप सिंह महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना अद्याप काँग्रेस पक्षाकडून कोणतंही पद देण्यात आलेलं नाही. संदीप सिंह यांची 2007मध्ये जेएनयू छात्रसंघाचे अध्यक्षपदी निवड झाली होती. उत्तर प्रदेशमधल्या प्रतापगड इथे राहणारे संदीप सिंह काही वर्षांपूर्वी चर्चेत आले होते. जेव्हा त्यांनी 2005मध्ये जेएनयूच्या एका कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना काळे झेंडे दाखवले होते.
काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात संदीप सिंह यांचं वजन वाढलं आहे. संदीप सिंह हे काँग्रेसच्या महासचिव आणि यूपीच्या प्रभारी प्रियंका गांधींनाही निवडणुकीसाठी मदत करत आहेत. प्रियंका गांधींबरोबर ते उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावरही दिसले होते. काँग्रेसला विरोध करमारे संदीप सिंह हे राहुल गांधींच्या फारच जवळ आले आहेत. 2017पासून संदीप सिंह राहुल गांधींच्या जवळपास घुटमळताना पाहायला मिळाले आहेत.
मध्यमवर्गातून आलेले संदीप सिंह यांनी अलाहाबाद युनिव्हर्सिटीतून पदवी मिळवली आहे. त्यानंतर जेएनयूच्या हिंदी विभागात अर्ज केला होता. 2005मध्ये त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काळे झेंडे दाखवले होते. संदीप सिंह हे कुशल वक्ते आहेत. जेएनयू सोडल्यानंतर त्यांनी डाव्यांपासून फारकत घेतली होती. 2011मध्ये अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल लोकपाल आंदोलनाचा भाग बनले होते.