लालू प्रसाद यादवांनी दिला काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला- शत्रुघ्न सिन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 08:31 PM2019-03-31T20:31:34+5:302019-03-31T20:33:37+5:30
भाजपाला सोडचिठ्ठी देऊन पाटणा-साहिबचे खासदार शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
नवी दिल्ली- भाजपाला सोडचिठ्ठी देऊन पाटणा-साहिबचे खासदार शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर आता शत्रुघ्न सिन्हांनीही काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला कोणी दिला, याचा खुलासा केला आहे. आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीच काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिल्याचं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत.
इतकंच नव्हे, तर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही मला पक्षात घेण्याची ऑफर दिली होती. परंतु मी पाटणा-साहिब मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असल्याचं शत्रुघ्न सिन्हांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. काँग्रेसमधून महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरूंसारखे महान नेते होऊन गेले आहेत आणि यात नेहरू-गांधी परिवारही आहे. काँग्रेसची स्वातंत्र्याच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
लालू प्रसाद यादव यांनीच मला काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला. मी तुमच्याबरोबर आहे आणि कोणत्याही राजकीय परिस्थितीत तुमच्याबरोबरच राहीन, असंही लालू म्हणाल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे. तसेच पाटणा-साहिब मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार असून, मोठ्या मताधिक्क्यानं यावेळी विजयी होईल, असा आशावादही शत्रुघ्न सिन्हांनी व्यक्त केला आहे.