नवी दिल्ली – काँग्रेसमध्ये सर्वकाही ठीक चाललंय असं दिसत नाही. आज पुन्हा एकदा ही बाब प्रखरतेने समोर आली. जितिन प्रसाद(Jitin Prasad) यांनी काँग्रेसचा(Congress) हात सोडून भाजपात(BJP) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यादृष्टीने ही चिंतेची बाब आहे. जे ४ नेते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जायचं त्यातील आतापर्यंत दोघांनी पार्टी सोडली आहे. राहुल गांधी जेव्हा काँग्रेस अध्यक्ष बनले होते. तेव्हा हे ४ नेते राहुल गांधींच्या एकदम जवळचे आणि विश्वासू शिलेदार मानले जायचे. या नेत्यांची चर्चाही बरीच झाली आहे.
काँग्रेसपेक्षाही मोठा राहुल गांधींना धक्का
ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद, सचिन पायलट आणि मिलिंद देवरा हे चार नेते जे वर्षानुवर्षे राहुल गांधींच्या युवा ब्रिगेडमधील शिलेदार मानले जात होते. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडची चर्चा व्हायची तेव्हा या नेत्यांची नावे प्रत्येकाच्या तोंडावर असायची. अनेकदा या ४ नेत्यांना एकत्र पाहिलं गेले आहे. आता या चौघांमधील केवळ दोघंही राहुल गांधींसोबत उभे आहेत. परंतु हे किती काळ आणखी सोबत राहतील हा खरा प्रश्न आहे. नवीन काँग्रेस अध्यक्षपदाची निवड वारंवार टाळणं. भाजपासमोर काँग्रेस दिवसेंदिवस कमकुवत होत चालल्याचं मानलं जातं.
काँग्रेसमध्ये राहिलेले दोघंही नाराज
मागील वर्षी राजस्थानमध्ये काय घडलं ते सगळ्यांनीच पाहिलं आहे. तेथील राजकीय वाद अद्यापही संपला नाही. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांविरोधात सचिन पायलट यांनी उघडपणे बंड पुकारलं होतं. त्यानंतर पक्षीय नेतृत्वाच्या मध्यस्थीने नाराजी कमी झाली. परंतु मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद लपून राहिला नाही. हायकमांडने प्रयत्न करूनही राजस्थानातील पक्षांतर्गत कलह संपलेला नाही. सचिन पायलट वेगवेगळ्या पद्धतीने आपली नाराजी बोलून दाखवतात.
राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये दुसरं नाव म्हणजे मिलिंद देवरा. पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी नेतृत्व देण्याची मागणी करत पक्षातील २३ नेत्यांनी जे पत्र पाठवलं होतं त्यात मिलिंद देवरा यांचाही समावेश होता. तसेच मिलिंद देवरा यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवरून भाजपाच्या काही धोरणात्मक निर्णयाला जाहीरपणे पाठिंबा दिला होता. मोदींचे कौतुकही केले होते. राज्यात महाविकास आघाडी सरकारला सत्तेत आलं. या आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रचारादरम्यान जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काँग्रेसची दिलेल्या आश्वासनांबाबत अद्याप हालचाल दिसत नसल्याची तक्रार मिलिंद देवरा यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाच पत्र पाठवून केली होती.
हाऊडी मोदी कार्यक्रमाचं कौतुक
मिलिंद देवरा यांनी या कार्यक्रमानिमित्त ट्विटमध्ये लिहिलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाउडी मोदी कार्यक्रमात केलेलं भाषण भारताच्या सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीसाठी महत्वपूर्ण होतं. माझे वडील मुरलीभाई हेदेखील भारत-अमेरिका यांच्या दृढ संबंधांतील एक शिल्पकार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा पाहुणचार आणि भारतीय अमेरिकींचे योगदान हा आपला गौरव आहे. त्यावर मोदींनीही मिलिंद देवरांचे आभार मानत सांगितले होते की, दिवंगत मुरली देवरा यांनीही अमेरिकेसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत. या दोन्ही देशातील मजबूत संबंध पाहून ते आनंदी झाले असते असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हणाले होते.