काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले ज्योतिरादित्य शिंदे संघस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 02:52 AM2020-08-26T02:52:32+5:302020-08-26T02:52:55+5:30
डॉ. हेडगेवार यांचे निवासस्थान राष्ट्रासाठी समर्पण दाखवणारे स्थान आहे. इथे येऊन प्रेरणा मिळते. त्यामुळे येथे नमन करायला आलो आहे.
नागपूर : काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले खा. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी संघस्थानी भेट दिली. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा ठरला.
सर्वात अगोदर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनतर ते रेशीमबाग येतील स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. तेथे त्यांनी हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोलवळकर गुरुजी यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले.
डॉ. हेडगेवार यांचे निवासस्थान राष्ट्रासाठी समर्पण दाखवणारे स्थान आहे. इथे येऊन प्रेरणा मिळते. त्यामुळे येथे नमन करायला आलो आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्यावर मी बोलणार नाही. तो काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे, असे मत सिंधिया यांनी व्यक्त केले.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे संघ मुख्यालयातच आहेत. शिंदे यांची त्यांच्याशी भेट झाली की नाही याबाबत मात्र गुप्तता बाळगण्यात आली.