राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदेंच्या गडाला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुरुंग लावला आहे. शिंदेंच्या प्रभावातील 20 पैकी 7 जागांवर काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत. शिंदे यांच्यासोबत 22 आमदारांनी बंडखोरी करत कमलनाथ सरकार पाडले होते. 22 पैकी 19 जण शिंदे समर्थक होते. तर उरलेल्यांपैकी काही दिग्विजय सिंह समर्थक होते.
या जागांवर मध्यप्रदेशमध्ये पोटनिवडणूक झाली. आज याठिकाणी मतमोजणी सुरु झाली आहे. या जागांवर भाजपाचे मंत्री राज्यवर्धन सिंह सर्वाधिक मताधिक्यात आहेत. त्यांना काँग्रेस उमेदवार कमल सिंह पटेल यांच्यापेक्षा 8334 जास्त मते मिळाली आहेत.
आघाडीवर असलेले सिंधिया समर्थक
- राज्यवर्धन सिंह दत्तीगांव, बदनावर
- तुलसी सिलावट, सांवेर
- डॉ. प्रभुराम चौधरी, सांची
- इमरती देवी, डबरा
- प्रद्युम्न सिंह तोमर, ग्वाल्हेर
- मुन्नालाल गोयल, ग्वाल्हेर पूर्व
- गोविंद सिंह राजपूत, सुरखी
- रणवीर जाटव, गोहद
- महेंद्र सिंह सिसौदिया, बमोरी
- जजपाल सिंह जज्जी, अशोकनगर
- बिजेंद्र सिंह यादव, मुंगावली
- मनोज चौधरी, हाटपिपल्या
- सुरेश धाकड़, पोहरी
पिछाडीवर असलेले सिंधिया समर्थक
- रघुराजसिंह कंषाना, मुरैना
- गिर्राज सिंह दंडोतिया, दिमनी
- कमलेश जाटव, अंबाह
- सूबेदार सिंह, जौरा
- जसवंत सिंह जाटव, करैरा
- ओपीएस भदौरिया, मेहगांव
- रक्षा सिरोनिया, भांडेर
मध्यप्रदेशमध्ये एकूण 28 जागांवर मतमोजणी सुरु आहे. य़ापैकी 19 जागांवर भाजप पुढे असून 8 जागांवर काँग्रेस पुढे आहे. तर अन्य 1 जागेवर आघाडीवर आहे. शिंदे यांच्या गडातील म्हणजेच ग्वाल्हेर-चंबळच्या 16 पैकी 7 जागांवर भाजपा पिछाडीवर आहे.
ऐन कोरोना काळात ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्याविरोधात बंड करत भाजपात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसची सत्ता गेली आणि शिवराज पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शिंदे समर्थक आमदारांनी राजीनामे दिल्याने पोटनिवडणूक लागली. यामध्ये शिंदे यांच्यासमोर भाजपात प्रस्थ वाढविण्याचे आव्हान पेलावे लागले. तर दुसरीकडे सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्याचे शल्य कमलनाथ यांच्या उराशी होते. यामुळे प्रामुख्याने हे मतदारसंघ शिंदे यांचा गड असल्याने शिंदे विरोधात कमलनाथ अशीच लढाई रंगली होती. काँग्रेसच्या 25 आमदारांनी राजीनामा दिला होता. तर तीन आमदारांचे निधन झाल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. काँग्रेस फोडून भाजपात आलेल्या 25 आमदारांना भाजपाने पुन्हा तिकिट दिले होते. यापैकी 14 जण शिवराज सरकारमध्ये मंत्री आहेत. सत्ता टिकविण्यासाठी भाजपाला केवळ 8 जागा हव्या आहेत. तर काँग्रेसला 28 पैकी 28 जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. यामुळे सर्व जागा काँग्रेस जिंकण्याची शक्यता फार कमी आहे.
शिंदे साईडलाईनप्रचारावेळी जनतेतून येणार प्रतिसाद पाहून शिंदे यांना भाजपाने बाजुला केले. प्रचार आणि पोस्टरांवरूनही शिंदे यांचे फोटो कमी होऊ लागले. अखेर निवडणुकीत ‘भाजपा है तो विश्वास है’ चा नारा देण्यात येऊ लागला, हा नारा पुढे बदलून 'शिवराज है तो विश्वास है' असा झाला होता. या गोष्टींचा परिणाम पोटनिवडणुकीतच नाही तर पुढील 2023 मधील निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आहे.