पुणे :निवडणुका म्हटल्या की, उमेदवारांची धावपळ, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदारांची उत्सुकता हे समीकरण येतेच. विशेषतः मोठ्या कार्यक्षेत्रात प्रचारासाठी फिरताना उमेदवारांसमोर प्रचाराचे अधिक आव्हान असते. अधिकाधिक भागात पोहोचता यावे यासाठी ते दररोजचे वेळापत्रक तयार करून प्रचार करत असतात. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार कांचन यांच्यासह संपूर्ण कुल परिवार प्रचारात मग्न असताना त्यांची मुलगी मायरा कुल मात्र आजोळी आजी-आजोबांचे वात्सल्य अनुभवताना दिसत आहे.
लोकमत प्रतिनिधींनी काल कांचन कुल यांचे माहेर असलेल्या वडगाव निंबाळकर या गावी भेट दिली. बारामतीपासून जवळच्या अंतरावर असणाऱ्या कुल यांचे वडील कुमारराजे उर्फ विजयसिंह निंबाळकर आणि त्यांच्या आई रोहिणीराजे निंबाळकर राहतात. सध्या त्यांच्या घरी एक छोटीशी पाहुणी राहायला आली आहे. ती आहे मायरा राहुल कुल. अवघ्या दीड वर्षांची असणारी मायरा सध्या आईच्या प्रचारात वडील आणि आजी (रंजना कुल) गुंतल्या असताना काही दिवस आजोळी आली आहे. इथे आजी आणि आजोबांसोबत तिचा दिवस मोठा मजेत जात असून तिच्या बागडण्यामुळे अंगणात चैतन्य आल्याचे तिचे आजोबा सांगतात.
या संदर्भात कुमारराजे निंबाळकर लोकमत प्रतिनिधीला म्हणाले की, मायरा तिच्या वडिलांची अतिशय लाडकी आहे. अगदी कांचन कुल यांचा अर्ज दाखल करतानाही ते तिला आवर्जून घेऊन गेले होते. कांचन कुल या भागात प्रचारासाठी आल्यावर लेकीला भेटून गेल्याचेही त्यांनी सांगितले. मतदान होईपर्यंत मायरा आजोळीच राहणार असून त्यानंतर दौंडला जाणार आहे.