नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांना सातत्याने विरोध करणारे भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा (Yashwant sinha) यांनी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी १९९९ मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात झालेले कंधार विमान अपहरणकांड (Kandahar plane hijack ) आणि ममता बॅनर्जींच्या (Mamata banerjee ) त्यावेळच्या भूमिकेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. (At the time of the Kandahar plane hijack, Mamata banerjee was offered to become a hostage, Yashwant sinha claims)
डिसेंबर १९९९मध्ये झालेल्या कंधार विमान अपहरणकांडावेळी ममता बॅनर्जींनी अपहृत प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांकडे स्वत: ओलीस म्हणून राहण्याची तयारी दर्शवली होती, असा दावा यशवंत सिन्हा यांनी केला आहे. याबाबत यशवंत सिन्हा म्हणाले की, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की, डिसेंबर १९९९ मध्ये जेव्हा इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाले होते. तेव्हा दहशतवाद्यांनी हे विमान अफगाणिस्तानमधील कंधार येथे नेले होते. त्या आणीबाणीच्या परिस्थितीत कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू झाली होती. तेव्हा ममता बॅनर्जींनी स्वत: ओलीस म्हणून दहशतवाद्यांकडे जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र दहशतवाद्यांनी इतर अपहृत प्रवाशांना दहशतवाद्यांनी सोडावे, अशी दहशतवाद्यांना अट घालण्यात यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. देशासाठी जे काही बलिदान द्यावे लागेल ते देण्याची तयारी त्यांनी केली होती, असे यशवंत सिन्हा यांनी सांगितले.
दरम्यान, यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांचे पुत्र जयंत सिन्हा हे मात्र भाजपामध्येच आहेत. यशवंत सिन्हा यांनी २०१८ मध्ये भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. पण जयंत सिन्हा भाजपातच राहिले. जयंत सिन्हा हे सध्या झारखंडमधील हजारीबाग येथून भाजपाचे लोकसभा सदस्य आहेत.