मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आज सकाळी मुंबईतून मनालीसाठी रवाना झाली. मात्र जाता जाता कंगनानं महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. कंगनानं एका शेरोशायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधत एका महिलेवर अन्याय करुन पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे असा दावा तिने केला आहे.
कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं धड़ियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं, मुझे कमज़ोर समझ कर, बहुत बड़ी भूल कर रहे हैं! एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर, अपनी इमेज को धूल कर रहे हैं!! या शेरोशायरीतून कंगना राणौतनं महाराष्ट्र सरकारवर लोकशाहीचं वस्त्रहरण केल्याचा आरोप केला आहे. तर मला कमकुवत समजण्याची मोठी चूक केली. एका महिलेला घाबरवत तिच्यावर अन्याय करत स्वत:ची प्रतिमा मलीन करत असल्याचा निशाणा शिवसेनेवर साधला आहे.
त्याचसोबत कंगनानं आणखी एक ट्विट केले आहे त्यात लिहिलं आहे की, जड अंतकरणाने मी मुंबई जात आहे. ज्यारितीने माझ्यावर इतके दिवस हल्ले झाले. शिविगाळ केली, माझ्या कार्यालयानंतर आता घर तोडण्याचा प्रयत्न केला. माझ्या चहुबाजुने हत्यारबंद सुरक्षा यामुळे माझं पीओकेबद्दल बोलणं योग्य होतं असा उल्लेख तिने पुन्हा एकदा केला आहे.
कंगनाबाबत शिवसेनेची भूमिका
मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. मुंबई प्रत्येकाची आहे. मात्र तिला बदनाम करण्याचा हक्क कोणालाही नाही. सध्या कोणता पक्ष काय बोलतोय याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. सत्ता गेलेली मंडळी राज्याबद्दल काय बोलत आहेत, याची नोंद आम्ही ठेवत आहोत, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपच्या प्रत्येक हालचालीवर आपलं लक्ष असल्याचं सांगितलं. एखाद्यानं ठरवलंच असेल की तमाशाच करायचा, तर करू द्या, मुंबईत येतेय, रोखून दाखवा असं आव्हान देऊन मुंबईत दाखल झालेल्या कंगनावर शिवसेनासंजय राऊत यांनी नाव न घेता निशाणा साधला. ज्या पोलिसांना नाव ठेवता, माफिया म्हणता, त्याच पोलिसांच्या संरक्षणात फिरता, अशा शब्दांत राऊत यांनी कंगनाला लक्ष्य केलं. तुम्ही ज्या अभिनेत्रीचं नाव घेताय, तिचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते.
कार्यालयानंतर कंगनाच्या फ्लॅटवर बीएमसीची नजर
मुंबई महापालिकेने दिवाणी न्यायालयाकडे कंगना रणौतचे खारमधील घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची परवानगी मागितली आहे. पालिकेचे म्हणणे आहे की कंगनाच्या फ्लॅटमध्ये आठ ठिकाणी अवैध बांधकाम करण्यात आले आहे. मुंबईतील खार रोड पश्चिम भागात 16 व्या रोडवर डिब्रीझ अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर कंगनाचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये एफएसआयचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने २०१८ मध्ये कंगनाला एमआरटीपी नोटीस दिली होती. मुंबई महापालिकेच्या एमआरटीपी नोटीस विरोधात तिने दिंडोशी न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी कोर्टाने कंगनाची बाजू ऐकून घेत पुढील कारवाईस स्टे दिला होता, तर पालिकेला यावर सविस्तर बाजू मांडण्यास सांगितले होते.