मुंबई – अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद पेटला असताना या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसही उतरण्याची शक्यता आहे. बीएमसीने कंगनाच्या अनाधिकृत कार्यालयावर हातोडा मारल्यानंतर पालिकेने २४ तासांत तत्परता दाखवत सुडबुद्धीने कारवाई केली असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर सोशल मीडियात कंगनाला २०१८ मध्ये नोटीस बजावल्याचं एक पत्र व्हायरल झालं.
या पत्राचं ट्विट करत कंगनानं म्हटलं होतं की, महाराष्ट्र सरकारचे पेड सोर्स चुकीची माहिती पसरवत आहेत. बीएमसीने मला कुठेही नोटीस पाठवली नव्हती. माझ्याकडे सगळी कागदपत्रे होती, जी बीएमसीकडून मला नुतनीकरणासाठी देण्यात आली होती. कमीतकमी बीएमसीनं धेर्याने उभं राहिले पाहिजे आता खोटं का बोलत आहात? असा सवाल करत तिने ते पत्र पोस्ट केले होते.
वास्तव म्हणजे बीएमसीने कंगनाच्या खार येथे फ्लॅट आहे त्याठिकाणी नोटीस पाठवली होती. ज्या बंगल्यावर बीएमसीने बुधवारी कारवाई केली त्या पाली हिल येथील मालमत्तेला कोणत्याही प्रकारे बीएमसीने नोटीस दिली नव्हती. यावरही जी नोटीस बीएमसीने पाठवली ती फक्त माझ्यासाठी नव्हती तर संपूर्ण इमारतीला होती. केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नव्हता. या नोटिशीला त्या बिल्डरने सामोरे जाण्याची गरज आहे, ही इमारत शरद पवारांशी संबंधित आहे. आम्ही हा फ्लॅट त्यांच्या पार्टनरकडून विकत घेतला आहे. त्यासाठी ते उत्तरदायी आहेत असंही कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तर कंगनाच्या या ट्विटला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही कंगनावर नाव न घेता निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये, पण जिला महाराष्ट्राबाबत काहीच माहिती नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली, मानसिकरोगी अशा शब्दात आव्हाडांनी कंगना राणौतवर टीका केली आहे.
दोन वर्षापूर्वीच पाठवली होती नोटीस
कंगना राणौतने खार रोड येथील दि ब्रीझ इमारतीत पाचव्या मजल्यावर असलेल्या घरातही नियमबाह्य बदल केल्याचा आरोप महापालिकेने केला आहे. याप्रकरणी तिला दोन वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने नोटीसही बजावली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने येथील कारवाई लांबणीवर पडली आहे. मात्र स्थगिती उठवल्यानंतर सदर वाढीव बांधकामही तोडण्याची तयारी पालिकेने केली आहे.
कंगनाच्या पाली हिल येथील बंगल्यावर कारवाई
कंगनाने २०१७ मध्ये पाली हिल येथे तीन हजार चौरस फुटांची जागा खरेदी केली. जानेवारी २०२० मध्ये तिने येथे ‘मणिकर्णिका फिल्म्स प्रा. लि.’ नावाने कार्यालय थाटले. गेले काही दिवस ती वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून तिने सातत्याने मुंबई पोलीस आणि शिवसेनेवर टीका केली. मुंबई शहराला ‘पाकव्याप्त काश्मीर’ अशी उपमा देऊन शिवसेनेचा रोष ओढवून घेतला. दरम्यान, एच पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांनी सोमवारी तिच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली.
कार्यालयातील १४ नियमबाह्य बांधकामांप्रकरणी तिला ‘काम थांबविण्याची’ नोटीस मंगळवारी सकाळी बजावण्यात आली. तिला २४ तासांची मुदत पालिकेने दिली होती. त्या वेळी कंगना मोहालीमध्ये असल्याने तिच्या वकिलांनी उत्तर देण्यासाठी पालिकेकडून सात दिवसांची मुदत मागितली. मात्र कंगनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न आल्याचे कारण देत पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि एच पश्चिम विभागाच्या ४० कर्मचारी-अधिकाऱ्यांनी जेसीबी आणि आवश्यक साधनसामग्रीच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्तात तळमजला, पहिला मजला आणि कार्यालयाबाहेरील वाढीव बांधकाम जमीनदोस्त केले.
कंगनाच्या बंगल्यावर कारवाई केल्यानं शरद पवारांची नाराजी
अभिनेत्री कंगना रणौत हिच्या कार्यालयावर महापालिकेने कारवाई करण्याची वेळ चुकीची आहे. मुंबईत अनेक अवैध बांधकामे आहेत. अशा कारवाईमुळे निष्कारण शंकेची पाल चुकचुकते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. कंगना रणौतवरून सुरू असलेल्या वादावर खा. पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुंबई पोलिसांबद्दल कोणी काही विधान केले अथवा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली तरी त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही. कारण मुंबई पोलिसांची कामगिरी सर्वांनाच ठाऊक आहे. प्रसिद्धी माध्यमांनीसुद्धा थोडे तारतम्य बाळगून, अशा गोष्टींना प्रसिद्धी दिली पाहिजे. शहाण्यांनी अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये असंही शरद पवार म्हणाले.