मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटला आहे. यातच कंगनाचं समर्थन करण्यासाठी सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्ती पुढे आली आहे. श्वेता थेट महाराष्ट्रात राम राज्य येण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा वापरली आहे. श्वेता सिंहच्या या पोस्टवर चाहत्यांनीही अनेक कमेंट केल्या आहेत.
कंगना राणौत हिच्या अनाधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने तोडक कारवाई केली. त्यानंतर भडकलेल्या कंगनानं मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करुन टीकास्त्र सोडलं. ज्या पद्धतीने आज माझं घर तुटलं तसेच तुमचा अहंकारही तुटेल असं कंगना राणौत म्हटली आहे. कंगनाच्या समर्थनासाठी आलेल्या श्वेताने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हे देवा, हा कसला गुंडाराज आहे, याप्रकारे अन्याय अजिबात सहन नाही केला पाहिजे. या अन्यायाला उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे आहे का? चला पुन्हा रामराज्य स्थापन करु असं तिने म्हटलं आहे.
त्याशिवाय आम्ही ग्रे सेल्सचा वापर करुन हे माहिती करु शकतो की ड्रग्स अँगल समोर आला. इतके समर्थक कुठून आले? आम्ही मुर्ख नाही. पूर्ण सत्य बाहेर येण्याची वाट पाहत आहोत आणि तेव्हा हे समर्थक कुठे जात हे आम्ही बघतो असंही श्वेता सिंह किर्तीने लिहिलं आहे. त्याचसोबत जमशेदपूर येथील आमदार सरयू राय यांनीही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
शरयू राय यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कंगना राणौत हिचं घर ज्यारितीने बीएमसीने तोडलं त्यावरुन त्याठिकाणी संविधानाचं रक्षण करणारं कोणी नाही हे सिद्ध होतं. मुंबईत जंगलराज सुरु आहे. हायकोर्टाने कोविड काळात तोडक कारवाई करण्यावर बंदी आणली होती. तरीही मुंबई महापालिकेने कारवाई केली. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात कंगना समोर येऊन भाष्य करतेय त्यामुळे बॉलिवूड माफियांसोबत मिळून महाराष्ट्र सरकारनं ही कारवाई केली आहे. कंगना विरोधात केलेल्या कारवाईचं शरद पवार, चिराग पासवानसह अन्य नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी केली. योगायोग म्हणजे महाराष्ट्रातील भाजपा नेते नारायण राणे यांनीही काही महिन्यांपूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यामुळे कंगनाच्या आडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं राजकारण होतंय का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.
न्यायालयाने दिली स्थगिती
घरमालक उपस्थित नसताना पालिकेने बंगल्यात प्रवेश कसा केला, असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेकडून पाडकामाबाबत स्पष्टीकरण मागितले. बंगल्यात बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने बजावलेल्या नोटिसीला कंगनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. पालिकेच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. या याचिकेवरील सुनावणी एस. जे. काथावाला व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठापुढे होती.
कंगनाची जीभ घसरली
महापालिकेने केलेल्या पाडकामाच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कंगना रनौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत, ‘आज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेल. हा काळाचा महिमा आहे, तो बदलत असतो,’ असे म्हणत बॉलीवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांचे गुळपीठ यानिमित्ताने उघड झाल्याचा आरोपही केला.
माझ्यापुरता विषय संपला - संजय राऊत
कंगनाप्रकरणी बुधवारी दुपारपर्यंत मौन बाळगणाऱ्या संजय राऊत यांनी त्यानंतर माध्यमांशी बोलताना, ‘मी कधीच कंगनाला धमकावले नव्हते. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्याबद्दलचा माझा राग मी व्यक्त केला होता. आज पालिकेने जी कारवाई केली त्याच्याशी माझा संबंध नाही. माझ्यापुरता हा विषय संपला आहे. मुंबईत कंगनाचे स्वागत आहे, ती येथे राहायला मोकळी आहे,’ असे राऊत स्पष्ट केले. याबाबतची पोस्टही त्यांनी ट्विटरवर शेअर केली.
राज्यपाल केंद्र सरकारकडे अहवाल पाठवणार
कंगनाच्या कार्यालयावर बीएमसीकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली असून, त्याबाबतची माहिती राज्य सरकारला देण्याची सूचना राज्यपालांनी केल्याचे वृत्त आहे. तसेच राज्यपाल याबाबत राज्य सरकारविरोधात केंद्र सरकारकडे अहवाल पाठवणार, असल्याची माहिती टीव्ही ९ ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.