लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेना नेत्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईत खार येथे सुमारे वावणे चार कोटी रुपये मोजून महागडे कार्यालय खरेदी केले आहे. यावर अभिनेत्री कंगना रनौतने केलेल्या टीकेमुळे या दोघींमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे.
कंगना आणि उर्मिला यांच्यात सरत्या वर्षात अनेकदा ट्विटरवर वाद झाले. विशेषत: कंगनाने मुंबई पोलिसांवर टीका केल्यानंतर उर्मिलाने तिचा चांगलाच समाचार घेतला होता, तर उर्मिलाच्या शिवसेना प्रवेशावरून कंगनाने टीका केली होती. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दोघींमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईमध्ये तीन कोटी ७५ लाख रुपयांचे ऑफिस खरेदी केल्याच्या वृत्तावर कंगनाने टीका करताना, आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, भाजपाला पाठिंबा देऊन मला काहीच मिळाले नाही, पण उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे. उर्मिलाजी मी स्वत:च्या मेहनतीने घर विकत घेतले होते, पण काँग्रेस ते तोडत आहे. भाजपाला खूश करून माझ्या हातात फक्त २५-३० कोर्ट केस आल्या आहेत. मीही तुमच्यासारखी समजूतदार असते, तर काँग्रसला खूश केले असते.
कंगनाच्या या ट्विटनंतर उर्मिलानेही आपल्या खास शैलीत तिला उत्तर दिले आहे. ‘प्रिय कंगनाजी, माझ्याबाबतचे तुमचे सर्व विचार मी ऐकले, मीच काय संपूर्ण देशाने ऐकले आहेत. संपूर्ण देशासमोर सांगतेय की, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा. सर्व कागदपत्रे घेऊन मी येते. या कागदपत्रामध्ये २०११ मध्ये स्वत:च्या मेहनतीवर अंधेरीत डी.एन. नगर येथे फ्लॅट विकत घेतल्याचा पुरावा मिळेल. २५-३० वर्षांच्या कारकिर्दीनंतर ही संपत्ती विकत घेतली होती, त्याचे पुरावे आहेत, तसेच मार्च, २०२० मध्ये तोच फ्लॅट विकला आणि त्याच पैशांतून ऑफिस विकत घेतल्याचे उत्तर उर्मिलाने दिले आहे.