नवी दिल्ली - कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा नेता आणि जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार सध्या वेगळ्याच कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कन्हैया कुमार कुमार विरोधात त्याच्याच पक्षाकडून निषेध प्रस्ताव पारित केला गेला आहे. कन्हैया कुमारने स्वपक्षीय नेत्यावर हात उगारल्याचा आरोप झाला असून, त्याच पार्श्वभूमीवर हैदराबादमधील नॅशनल कौन्सिलच्या बैठकीत हा निषेष प्रस्ताव पारित केला गेला आहे.
हैदराबादमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत कन्हैया कुमार याला स्पष्ट शब्दात ताकीदही दिली गेली आहे. कन्हैयाने यापूर्वीही आपल्या पक्षावर टीका केली होती. त्यावेळी तो सीपीआयला कन्फ्युजन पार्टी ऑफ इंडिया म्हणाला होता. दरम्यान, सीपीआयच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की बैठकीत, ११० सदस्य उपस्थित होते. त्यापैकी केवळ तीन जणांना सोडून इतर सर्वांनी कन्हैया कुमार विरोधातील निषेध प्रस्तावाला पाठिंबा दिला.विविध आंदोलनांमुळे अल्पावधीत राष्ट्रीय पातळीवर चमकलेला कन्हैया कुमार आपल्या पाठिराख्यांसह १ डिसेंबर २०२० रोजी बेगुसराय जिल्हा कौन्सिलची बैठक घेण्यासाठी पाटणा येथील कार्यालयात पोहोचला होता. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ही बैठक स्थगित झाली. कन्हैया कुमारला बैठक स्थगित झाल्याची माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे तो संतापला. रागाच्या भारात त्याने आणि त्याच्या पाठीराख्यांनी बिहार प्रदेश कार्यालयाचे सचिव इंदुभूषण वर्मा यांच्यासोबत गैरवर्तन केले, तसेच धक्काबुक्की करून मारहाण केली होती.