नवी दिल्लीः कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा 26 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. स्वतः येदियुरप्पांनी आपल्या राजीनाम्याची संकेत दिले आहेत. पक्ष श्रेष्ठींनी दिलेल्या आदेशाचे मी पालन करेल, असे येदियुरप्पा म्हणाले. तसेच, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मनात माझ्याबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे, असंही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, भाजपामध्ये जो व्यक्ती 75 वर्षांच्या पुढे जातो, त्याला कुठल्याच पदावर राहता येत नाही. पक्षाने नेहमीच माझ्या कामाचे कौतुक केले आणि 78-79 वर्षापर्यंत मला काम करण्याची संधी दिली. पदावरुन बाजुला काढल्यावरही मी पक्ष मजबुत करण्यासाठी आणि पुढच्या निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्ते आणण्यासाठी काम करेल. 26 जुलैला आमच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जो आदेश देतील, त्या आदेशाचे पालन करेल, असंही ते म्हणाले.
येदियुरप्पांच्या ट्वीटने दिले संकेतबुधवारी बीएस येदियुरप्पांनी ट्विट करत आपल्या राजीनाम्याचे संकेत दिले होते. त्यांनी ट्विटमध्ये लिहीले, 'भाजपाचा इमानदार कार्यकर्ता असल्याचा मला गर्व आहे. मी उच्च विचारांचे अनुसरण करून पक्षाची सेवा केली हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आवाहन करतो की, त्यांनी पक्षाच्या आदर्शांचे पालन.'
खराब प्रकृतीमुळे पद सोडणार सूत्रांनी सांगितल्यानुसार, येदियुरप्पांनी आरोग्याचे आणि वाढत्या वयाचे कारण देत 16 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राजीनामा स्विकारण्याची विनंती केली होती. परंतू, पक्षाने त्यापूर्वीच त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची चर्चा आहे. दरम्यान, येदियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर नवीन मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत प्रह्लाद जोशी, बीएल संतोष, लक्ष्मण सवदी, उपमुख्यमंत्री मुर्गेश निराणी, वसवराज एतनाल, अश्वत नारायण, डीवी सदानंद गौडा यांच्या नावांची चर्चा आहे.