कर्नाटक : सिद्धरामैय्या यांचा दावा, "RSS लवकरच येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार"
By जयदीप दाभोळकर | Published: January 18, 2021 09:26 AM2021-01-18T09:26:50+5:302021-01-18T09:28:25+5:30
यापूर्वी कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या अमित शाह यांनी त्यांचं केलं होतं कौतुक
कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावर पाहू इच्छित नाही. त्यांना यावर्षी एप्रिलपर्यंत मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात येईल, असा दावा सिद्धरामैय्या यांनी केला आहे.
यापूर्वी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी बी.एस.येडियुरप्पा गे आपला कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढील निवडणुकांमध्ये भाजपा पूर्ण बहुमतानं सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. "मी काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य वाचतो. कर्नाटकात अनेक शक्यता व्यक्त करतात. पण मी प्रत्येकाला एकच सांगू इच्छितो की भाजप सरकार आपला पांच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढील निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमतानं परतेल," असं अमित शाह म्हणाले होते.
अमित शाह यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटक विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सिद्धरामैय्या यांनी मोठं विधान केलं. "अमित शाह यांनी जरी सांगितलं की येडियुरप्पा हे मुख्यमंत्रीपदी कायम राहतील तरी हे केवळ नावासाठी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या नेत्यांनुसार येडियुरप्पा यांना एप्रिल नंतर मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात येईल," असंही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूत्रांकडून आपल्याला ही माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. परंतु काही नेत्यांना त्यात स्थान न मिळाल्यानं ते नाराज असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. रविवारी आपल्या भाषणादरम्यान अमित शाह यांनी येडिय़ुरप्पा यांच्या कामाचं कौतुक तेलं होतं. तसंच त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलं असून केंद्राच्या सर्वच योजना आपल्या येथे लागू केल्याचंही ते म्हणाले होते.