कर्नाटक: कॉँग्रेस-जेडीएस आघाडीचे भाजपसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 03:41 AM2019-04-23T03:41:40+5:302019-04-23T03:42:11+5:30
मोदी लाट असतानाही मागील लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपच्या जागा घटल्या होत्या. यावेळी काँग्रेसने जनता दलाशी (सेक्युलर) आघाडी केली.
बंगळुरू : मोदी लाट असतानाही मागील लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपच्या जागा घटल्या होत्या. यावेळी काँग्रेसने जनता दलाशी (सेक्युलर) आघाडी केली. ही आघाडी व विधानसभेत वाढलेल्या मतांच्या टक्क्याने कॉँग्रेस अधिक यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. सन २००९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला १९, कॉँग्रेसला ६ तर जनता दलाला ३ जागा मिळाल्या होत्या. सन २०१४च्या निवडणुकीमध्ये भाजपला १७, कॉँग्रेसला ९ तर जनता दलाला २ जागा मिळाल्या होत्या.
मागील वर्षी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मोठी चुरस दिसून आली. कोणालाच बहुमत न मिळाल्यामुळे कॉँग्रेस-जनता दलाने आघाडी करून सत्ता स्थापन केली आहे. विधानसभेत कॉँग्रेसला ३८ टक्के (यापूर्वी ३६.६ टक्के) मते मिळाली. कॉँग्रेसची मते वाढली असली तरी त्यांच्या जागा मात्र घटल्या. ही किमया तिरंगी लढतींमुळे झाली. यावेळी कॉँग्रेस-जनता दलाने आघाडी करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना अधिक जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
देवेगौडांची तिसरी पिढीही सक्रिय
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची तिसरी पिढी या निवडणुकीतून राजकारणामध्ये प्रवेश करीत आहे. हसन या देवेगौडा यांच्या नेहमीच्या मतदारसंघातून त्यांचे नातू प्रज्वल रेवण्णा निवडणूक लढवत आहेत, तर दुसरे नातू आणि मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांच्या मतदारसंघात मतदान दुसऱ्या टप्प्यात झाले आहे. स्वत: देवेगौडाही रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीमधून देवेगौडा यांची तिसरी पिढी राजकारणामध्ये सक्रिय होत असल्याचे दिसत आहे.