बंगळुरु – कर्नाटकच्या बंगळुरु शहरातील एमएलसी निवडणुकीत काँग्रेस उमेदवार युसूफ शरीफ उर्फ केजीएफ बाबू उर्फ स्क्रॅप बाबू यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांची संपत्ती जाहीर केली आहे. युसूफ शरीफ यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी १ हजार ७४३ कोटींची संपत्ती घोषित केली आहे. त्याचसोबत ते कर्नाटकातील सर्वात श्रीमंत राजकीय नेते बनले आहेत.
यापूर्वी सत्ताधारी पक्ष भाजपा सरकारचे मंत्री एमटीबी नागराज यांनी १२०० कोटींची संपत्ती घोषित केली होती. आतापर्यंत त्यांना राज्यातील सर्वात श्रीमंत राजकीय नेते मानलं जायचं. परंतु आता युसूफ शरीफ यांनी त्यांच्यावर मात करत पुढे निघून गेले आहेत. ५४ वर्षीय युसूफ शरीफ यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात लिहिलंय की, त्यांच्याकडे १.१० कोटींची हातातील घड्याळ आहे. ४.८ किलो सोनं आणि बंगळुरु व आसपास शेकडो एकर कृषी आणि गैरकृषी जमीन आहे. ज्याची किंमत १५९३ .२७ कोटी इतकी आहे.
युसूफ शरीफ यांनी अमिताभ बच्चन यांची कार खरेदी केली
युसूफ शरीफ यांनी बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची एक रोल्स रॉयल फँटम कार खरेदी केली होती. ज्यामुळे ते अलीकडेच चर्चेत आले होते कारण परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं ही गाडी जप्त केली होती. युसूफ शरीफ १४ भाऊ बहिणींमध्ये सगळ्यात मोठे आहेत. गरिबीत त्यांनी उदरनिर्वाह केला. ते रिअल इस्टेटचा व्यवहार करतात. सूत्रांच्या माहितीनुसार ४ हजार कोटींपेक्षा त्यांची संपत्ती आहे. युसूफ शरीफ भारतात गोल्ड माइंस स्क्रॅ मटेरियल डिवीजनचं काम करतात. युसूफ शरीफ यांचे वडील बेकरी चालवायचे. परंतु नुकसान झाल्यानं त्यांना बेकरी बंद करावी लागली त्यानंतर युसूफ शरीफ यांनी रिक्षा चालवण्याचं काम केले. त्यानंतर भंगार व्यवसाय सुरु केला आणि त्यांचे नशीब पालटले. युसूफ शरीफ यांचा व्यवसाय जमीन खरेदीविक्री करणं हा आहे. त्यांच्या २ पत्नी आहेत. रुकसान ताज आणि शाजिया तरन्नुम असं नाव आहे. त्यांना ५ मुले आहेत. युसूफ शरीफ यांनी १०० कोटींची जंगम मालमत्ता आणि १६४३ कोटींची स्वाथर मालमत्ता असल्याचं घोषित केले आहे.