नेहमीच राजकीय दृष्ट्या अशांत राहिलेल्या कर्नाटकात काँग्रेस-निजदचे सरकार पाडून भाजपाने सत्ता हिसकावली असली तरीही भाजपात सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. मंत्रिमंडळविस्तारावरून मुख्यमंत्री येडीयुराप्पांना आमदारांची प्रचंड नाराजी झेलावी लागत आहे. आता एक आमदाराने 13 एप्रिलची तारीख जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीपासूनच कर्नाटकचे राजकारण अस्थिर झाले आहे. काँग्रेस-निजदने एकत्र येत बहुमत असलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले. परंतू दीड वर्षानंतर त्यांचे आमदार फोडून भाजपाच्या येडीयुराप्पांनी पुन्हा सत्ता हिसकावून घेतली. आता पुन्हा कर्नाटकात मंत्रीमंडळ वाटपावरून भाजपाच्या आमदारांनी बंड पुकारले असून येडीयुराप्पा यांची खूर्चीच धोक्यात येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या महिन्यात कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यावेळी भाजपाच्या आमदारांनी उघडउघड नाराजी व्यक्त करताय येडीयुराप्पांनी त्यांना दिल्ली हायकमांडकडे जाण्यास सांगितले. मंत्रिमंडळात ज्यांना संधी मिळाली त्यांची नावे दिल्लीत ठरविण्यात आल्याचे त्यांनी सांगतानाच एक मंत्रीपद रिक्त असल्याचेही ते म्हणाले होते. मात्र, यानंतर भाजपाच्या आमदारांनी येडीयुराप्पांवर रहस्यमयी सीडीवरून गंभीर आरोप करण्यास सुरुवात केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
भाजपाच्य़ा आमदारांचे आरोपमंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपाचे आमदार बीपी यतनाल यांनी गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री येडीयुराप्पांना काही आमदार या सीडीवरून गेल्या तीन महिन्यांपासून ब्लॅकमेल करत आहेत. यापैकी एकाला राजनैतिक सचिव आणि दोघांना मंत्री बनविण्यात आले आहे, असे ते म्हणाले. यानंतर पुन्हा ती सीडी चर्चेत आली आहे. आता याच बसनगौडा पाटील यतनाल यतनाल (BJP MLA Basanagouda Patil Yatnal) यांनी पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वाट मोकळी करून दिली आहे.
कर्नाटकमध्ये उगडी सणापासून नवीन वर्ष साजरे केले जाते. हे वर्ष यंदा 13 एप्रिलपासून सुरु होत आहे. या दिवसाला कर्नाटकला नवीन मुख्यमंत्री मिळेल असे वक्तव्य पाटील यांनी केले. ते विजयपुरामध्ये बोलत होते. मला हात पसरून मंत्रीपद मागायची गरज राहणार नाही. कारण आपला माणूस मुख्यमंत्री होणार आहे. तोच मला मंत्रीपद देणार आहे. हा नेता उत्तर कर्नाटकातील असेल, वाट पहा आणि बघा, असे ते म्हणाले.