मधुबनी: तुमच्या पतीनं एनडीएला मतदान न केल्यास त्यांना जेवण देऊ नका. त्यांना उपाशीच ठेवा, असा सल्ला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांना दिला. तुमच्या पतींना एनडीएला मतदान करण्यास सांगा. त्यांनी एनडीएला मतदान न केल्यास त्यांना जेवायला देऊ नका. दिवसभर त्यांना उपाशीच राहू दे, असं नितीश कुमार म्हणाले. ते मधुबनीत एका प्रचारसभेत येथे बोलत होते. झांझरपूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या मधुबनीमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर नितीश यांनी अंधाराथरीमध्ये महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. मोदी देशात आणि देशाबाहेर अनेक आव्हानांचा सामना करत आहेत. या परिस्थितीत काम करताना त्यांनी जगभरात देशाची मान उंचावली. जगातल्या अनेक देशांकडून त्यांचा सन्मान होत आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदींचं कौतुक केलं.यावेळी नितीश यांनी राष्ट्रीय जनता दलावर शरसंधान साधलं. लालू-राबडी यांच्या सत्ताकाळातले काळे दिवस लक्षात ठेवा आणि संयुक्त जनता दल-भाजपा सरकारनं केलेली विकासकामं विसरू नका, असं नितीश म्हणाले. महाआघाडी जाती-धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ता मिळवायची आणि बिहारच्या जनतेला लूटायचं हेच महाआघाडीचं ध्येय असल्याची टीका त्यांनी केली.
'पतीनं एनडीएला मत न दिल्यास त्याला उपाशी ठेवा'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 3:32 PM