नवी दिल्ली - केरळमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण तापलं आहे. सत्तेवर असलेल्या एलडीएफ म्हणजेच लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रण्टवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी केरळमधील कोल्लमच्या करुनागप्पलीत निवडणक प्रचारादरम्यान राज्यातील पिनरई विजयन (Pinarayi Vijayan) सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री विजयन यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात उघडकीस आलेल्या सोने तस्करीच्या प्रकरणावरून प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला आहे. तसेच केरळचे मुख्यमंत्री सोन्याच्या तस्करीत व्यस्त असल्याचं म्हणत हल्लाबोल केला आहे.
"केरळची लोकं हेच राज्याचं खरं सोनं आहेत. पण मुख्यमंत्री सोन्याची तस्करी करण्यात आणि विदेशी कंपन्यांना मासेमारीचे कंत्राट देण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री कॉर्पोरेट जाहीरनाम्याचं पालन करत असून, कॉर्पोरेट कंपन्यांच्या मालकांना राज्याची संपत्ती विकण्याचाच त्यांचा अजेंडा आहे" अशी घणाघाती टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. तसेच "तुमच्यासमोर तीन प्रकारच्या राजकारणाचे पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे शोषण, घोटाळे आणि हिंसाचार करणाऱ्या सीपीएमचं राजकारण. दुसरा द्वेषाचं आणि विभाजन करणारं भाजपाचं राजकारण. तर तिसरा पर्याय केरळच्या भविष्याची दृष्टी असलेलं काँग्रेसचं राजकारण. सीपीएमची मागील पाच वर्ष घोटाळे, दडपशाही आणि पक्षपातीपणाची होती" असं देखील प्रियंका यांनी म्हटलं आहे.
आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assam Assembly Elections 2021) पार पडणार आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) या काही दिवसांपूर्वी आसाममध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांनी चहाच्या मळ्यातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसंच त्यांच्या कामाचं स्वरूपही जाणून घेतलं. प्रियंका गांधी यांनी चहाच्या पानं खुडत मजुरांशी गप्पाही मारल्या. त्या पारंपारिक वेशभुषेत उपस्थित होत्या. यावरूनच भाजपाने आता काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांनी सणसणीत टोला लगावला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
"जे 'चायवाला' म्हणून पंतप्रधानांची खिल्ली उडवत होते, तेच आज चहापत्ती खुडत आहेत", भाजपाचा सणसणीत टोला
राजनाथ सिंह यांनी आसामच्या लुमडिंगमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चायवाला' म्हणून अनेकदा त्यांची चेष्टा करण्यात आली आहे. त्यावरून राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "आधी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्यांनी "चायवाला" असं म्हणत खिल्ली उडवली होती, तीच लोकं आज चहापत्ती खुडत आहेत आणि विकत आहेत. खऱ्या चायवाल्याने त्यांना चहाच्या मळ्यांपर्यंत आणून सोडलं आहे. पण खबरदार, खरा आणि प्रामाणिक चायवाला आमच्यासोबत आहे" असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.