Kerala Assembly Election Result 2021: केरळचा गड राखत डाव्यांनी इतिहास रचला! ४० वर्षांची परंपरा खंडित; काँग्रेसचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 18:24 IST2021-05-02T18:23:38+5:302021-05-02T18:24:27+5:30
Kerala Assembly Election Result 2021: केरळमध्ये सत्तापरिवर्तनाची परंपरा खंडित; डाव्यांची सत्ता कायम राहणार

Kerala Assembly Election Result 2021: केरळचा गड राखत डाव्यांनी इतिहास रचला! ४० वर्षांची परंपरा खंडित; काँग्रेसचा पराभव
तिरुअनंतपुरम: केरळमध्ये डाव्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत सत्ता राखली आहे. केरळात दर पाच वर्षांनी सत्तापरिवर्तन होतं. १९८० पासून सत्तापरिवर्तनाची परंपरा सुरू आहे. मात्र अखेर ४० वर्षांनी ही परंपरा खंडित झाली आहे. मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखाली एलडीएफनं विजय मिळवला आहे. सध्या एलडीएफचे उमेदवार १४० पैकी ९३ जागांवर पुढे आहेत. तर काँग्रेसप्रणित यूडीएफ ४३ मतदारसंघांत आघाडीवर आहे.
गेल्या निवडणुकीत एलडीएफला ९१ जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत एलडीएफच्या जागा वाढल्या आहेत. विशेष म्हणजे केरळमधील सत्ता परिवर्तनाची परंपरा डाव्यांनी खंडित केली आहे. त्यामुळे काँग्रेसप्रणित यूडीएफला पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसावं लागेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं केरळमध्ये खातं उघडलं होतं. भाजपचा एक उमेदवार विजयी झाला होता. आताही भाजपचा एकच उमेदवार आघाडीवर आहे.
मेट्रोमॅन म्हणून ओळख असलेल्या ई. श्रीधरन यांना भाजपनं पलक्कडमधून उमेदवारी दिली होती. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये त्यांनी आघाडीही घेतली. मात्र त्यानंतर ते पिछाडीवर गेले. काँग्रेसप्रणित यूडीएफ आघाडीच्या शफी परमबिल यांनी त्यांचा पराभव केला. मुख्यमंत्री पिनरायी विजयन, आरोग्यमंत्री के. के. शैलजा, माजी मुख्यमंत्री ओमान चंडी, विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांनी त्यांच्या मतदारसंघात आगेकूच कायम राखली आहे.