कोरोनाकाळात कौतुक झालेल्या आरोग्यमंत्री शैलजा यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू, केरळच्या मुख्यमंत्र्यांचा धक्कादायक निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 14:55 IST2021-05-18T14:55:20+5:302021-05-18T14:55:27+5:30
Kerala Politics News : केरळमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले तरी केरळ सरकारने त्यांचे योग्य व्यवस्थापन केल होते. त्यामुळे केरळ सरकारचे आणि आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांचे कौतुक झाले होते.

कोरोनाकाळात कौतुक झालेल्या आरोग्यमंत्री शैलजा यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू, केरळच्या मुख्यमंत्र्यांचा धक्कादायक निर्णय
तिरुवनंतपुरम - संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना केरळमधील सरकार कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरले होते. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले तरी केरळ सरकारने त्यांचे योग्य व्यवस्थापन केल होते. त्यामुळे केरळ सरकारचे आणि आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांचे कौतुक झाले होते. मात्र आता केरळमध्ये विधानसभा निवडणूक होऊन राज्यात पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा डाव्यांची सत्ता आली असतानाही शैलजा यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाणार नाही. यावेळी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटमध्ये भापक आणि माकपमधील नव्या चेहऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.
के.के. शैलजा ह्या निवृत्त शिक्षिका आहेत. त्यांनी केऱळमध्ये कोरोनाच्या साथीला रोखण्यामध्ये सुरुवातीच्या काळात प्रशंसनीय कार्य केले होते. तसेच राज्यात निपाह विषाणूला रोखण्यासाठीही त्यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली होती. केरळमध्ये २०१८ आणि २०१९ मध्ये निपाह विषाणूचा फैलाव झाला होता. मात्र त्याला रोखण्यात केरळ सरकार यशस्वी ठरले होते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही कोरोनाकाळात के.के. शैलजा यांनी केरळमध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी आखलेल्या रणनीतीची प्रशंसा केली होती. तसेच इतर राज्यांनीही त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन केले होते.
केरळमध्ये पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ आघाडी सरकारचा शपथविधी हा २० मे रोजी होणार आहे. दुपारच्या वेळी होणाऱ्या या शपथविधीमध्ये राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे मुख्यमंत्री विजयन यांच्यासह २१ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.