मुंबई:मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, पंढरपूरची पायी वारी यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपही होताना पाहायला मिळत आहेत. त्यातच पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात वडमुखवाडी चरहोली येथे स्थानबद्ध करण्यात आले. तर, दुसरीकडे मराठा आरक्षण मोर्चाच्या पार्श्वभूमी सोलापूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला असून, अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोकं कसं विसरतील, अशी विचारणा केली आहे. (keshav upadhye criticised maha vikas aghadi govt over maratha reservation and pandharpur payi wari)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापुरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असताना आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील व आमदार प्रशांत परिचारक यांना पोलिसांनी अडविले. तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापूर - पुणे महामार्ग रोखला. या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर टीका करत ही दडपशाही कशासाठी अशी विचारणा केली आहे.
मग ही दडपशाही कशासाठी?
काल वारकऱ्यावर कारवाई आज सोलापूरात मराठा समाजाचा मोर्चा निघू नये म्हणून अभूतपूर्व बंदोबस्त आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिस फौजफाटा, सर्व बाजूने रस्ते बंद.. मराठा समाजाने शांततेत मोठे मोर्चे काढलेत मग ही दडपशाही कशासाठी? अशी दडपशाही करून आघाडीसरकारच आरक्षण अपयश लोक कस विसरतील?, असे सवाल केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहेत.
सरकार बिल्डरांना सवलती देतंय
दुसऱ्या एका ट्विटमध्ये केशव उपाध्ये यांनी राज्यात लागोपाठ झालेल्या आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्यातील युवा, शेतकरी, कलाकार हे निराशेने आत्महत्याचा मार्गावर असताना उद्धव ठाकरे सरकार काय करतय तर बिल्डरांना सवलती देत आहे. चार घटना त्यात एकाच दिवशी ३ आत्महत्या १. प्रशासनाच्या अनास्थेमुळे लोहा नांदेड येथील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या. २. एमपीएसीतील विलंबामुळे स्वप्नील लोणकर आत्महत्या. ३. कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांची आत्महत्या मात्र राज्य सरकारची प्राथमिकता काय तर, BDD चाळ प्रकल्प एकही वीट लावली नसताना बिल्डर्सना ५०० कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव, असे टीकास्त्र उपाध्ये यांनी सोडले आहे.