अजित पवार अन् जितेंद्र आव्हाडांच्या नाराजीच्या वृत्तावर खडसेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
By मुकेश चव्हाण | Published: October 24, 2020 02:34 PM2020-10-24T14:34:52+5:302020-10-24T14:47:00+5:30
12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच राष्ट्रवादीत येतील, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
मुंबई: भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश म्हणजे भाजपाला मोठा धक्का बसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आता एकनाथ खडसे यांनी केलेल्या एका दाव्यानंतर भाजपात खळबळ उडाली आहे.
एबीपी मराठीच्या वृत्तानूसार, 12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच राष्ट्रवादीत येतील, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांच्या या दाव्यानंतर नेमके कोणते माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या वृत्तावरही एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या बातम्या बघून माझी आणि शरद पवारांची खूप करमणूक झाली, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, मला पक्ष न सोडण्यासाठी कोणीही फोन केला नाही. फक्त भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी फोन केला होता. अन्यथा कोणालाही माझी गरज नव्हती. साधा संघटन मंत्र्यांचाही फोन आला नाही, तो आला असता तर मी किमान भाजपा सोडण्याचा फेरविचार केला असता. आता भाजपमध्ये यूझ अॅन्ड थ्रोची पद्धत आहे, अशी टीका देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे.
तत्पूर्वी, एकनाथ खडसेंना कृषिमंत्री देण्यात येईल असं सांगण्यात येत होतं, परंतु शिवसेना कृषी खातं सोडण्यास उत्सुक नाही अशी माहिती मिळतेय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर आता खडसेंच्या पुनर्वसनाचं आव्हान असणार आहे. शिवसेना कृषी खातं सोडण्यास तयार नसल्यानं एकनाथ खडसेंना गृहनिर्माण खातं दिलं जाईल अशी चर्चा आहे. मात्र जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खातं सोडण्यास अनुकूल नाहीत. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. बराच वेळ दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर हे नेते खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले होते.
खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला नवी उर्जा मिळाली- अजित पवार
खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे अशा शब्दांत अजित पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले. खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. खडसेसाहेब, रोहिणीताई खडसे, त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी, समस्त कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पक्षांमध्ये हार्दिक स्वागत. पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय श्री. एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी @NCPspeaks पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. मा. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ,ऊर्जा मिळाली आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 23, 2020