आयपीएसप्रमाणेच अनेक माजी आयएएस अधिका-यांनीही निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. उत्तम खोब्रागडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरपीआयमध्ये प्रवेश केला. तर विजय नहाटा यांनी शिवसेनेची वाट धरली होती.
माजी आयपीएस अधिकारी पीके जैन यांनीही त्यांचा पोलिस खात्याला रामराम करत रामदास आठवले यांच्या आरपीआयमध्ये प्रवेश केला आहे.
माजी पोलिस अधीक्षक संजय अपरांती यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. रायगडमधून सुनील तटकरेंविरोधात त्यांनी निवडणूक लढवली खरी मात्र यात अपरांती यांचा पराभव झाला.
माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनीदेखील आम आदमी पक्षाच्या तिकीटावर बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र सुप्रिया सुळे यांच्यासमोर खोपडे अपयशी ठरले.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा देत भाजपाची वाट धरली. उत्तरप्रदेशमधील बागपत मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडूनही आले आहेत.
माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला असून भाजपाने त्यांना दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. विशेष म्हणजे बेदी यांच्यासमोर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे आव्हान असून तेदेखील भारतीय राजस्व सेवेतील माजी अधिकारी आहेत.
पोलिस खात्यातून राजकारणात जाण्याचा नवा ट्रेंड आता रुजू झाला असून चकमक फेम रवींद्र आंग्रे यांनी सोमवारी भाजपात प्रवेश केला आहे. रविंद्र आंग्रे यांनी ५० हून अधिक एन्काऊंटर केले असून बनावट चकमक हप्तावसूलीप्रकरणी ते खात्यातून निलंबित झाले होते. मात्र कोर्टाने सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष सुटका केली होती. खाकीतून खादीकडे जाणा-या पोलिस अधिका-यांचा घेतलेला हा आढावा....