श्रीवर्धन : रायगड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कर्तृत्ववान खासदारांची गरज आहे. केंद्रातील निधीचा वापर कसा करावा, याची जाण विद्यमान खासदारांना नाही. मला कोकणच्या मातीचे ऋण विकासाच्या रूपाने फेडायचे आहेत. श्रीवर्धनचा आमदार या नात्याने विकासकामे करण्याचे भाग्य मला लाभले. आता खासदार म्हणून काम करण्याची संधी द्या. रायगड जिल्ह्याचे पर्यटन जगाच्या नकाशावर दिसेल, असे वक्तव्य आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी के ले.श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित प्रचारसभेत ते बालत होते. श्रीवर्धनमधील कसबापेठेतील चौकसभेत त्यांनी उपस्थित कार्यकर्ते व मतदार यांना संबोधित केले. जनतेचा प्रतिनिधी या नात्याने मला विकासाची गंगा दिल्लीवरून रायगडपर्यंत आणायची आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची विकासकामे मी श्रीवर्धनचा आमदार या नात्याने केली आहेत. श्रीवर्धनचा कायापालट करण्याचे भाग्य मला लाभले आहे. भविष्यात विविध समाजोपयोगी विकासकामांना मी चालना देणार आहे. गेली पाच वर्षे सत्तेत नसतानासुद्धा विकास निधींची कमतरता मी कधीच भासू दिली नाही. आज रायगड जिल्ह्यातील जनता विकासाच्या पाठीशी उभी आहे, याचा मला विश्वास आहे. बॅरिस्टर अंतुले हे माझे मार्गदर्शक होते. त्यांनी कोकणाच्या विकासाला चालना दिली. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी अर्थमंत्री असताना सर्वात मोठे पॅकेज कोकणाच्या जनतेसाठी दिले. त्या वेळी विरोधातील पक्षाने हा कोकणचा अर्थसंकल्प आहे असे बोलत माझ्यावर टीका केली. मला कोकणच्या मातीचे ऋण विकासरूपी कर्तुत्वाने फेडायचे आहे, असे तटकरे यांनी सांगितले.अनंत गीते यांच्या प्रचारसभेतील त्यांच्या भाषाशैलीची संभावना करताना तटकरे यांनी सांगितले, मला यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांचा वैचारिक वारसा लाभला आहे ते संस्कार आमच्यावर आहेत. त्यामुळे माझी सापाशी केलेली तुलना ही असंस्कृतपणाचे द्योतक आहे. या वर्षीची लढाई ही निष्क्रियतेविरुद्ध विकास अशी करायची आहे. अनंत गीते रायगडच्या जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात अपयशी झाले आहेत. त्यांच्या निष्क्रियतेमुळे जनता कंटाळली आहे.राजकारणात वारसदार हा रक्ताने नव्हे तर विचारांच्या अथांगतेतून कर्तृत्व सिद्धीद्वारे ठरवला जातो, असे तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे नावीद अंतुले यांच्या शिवसेना प्रवेशासंदर्भात भाष्य केले. तालुक्यातील मुस्लीम समाज माझ्या पाठीशी उभा आहे. मी धर्मनिरपेक्ष विचारांचा पाईक आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे. आपला विकास साधावा, विकासातून प्रगतीची दारे सर्वांसाठी खुली व्हावीत त्यासाठी मला खासदार म्हणून संधी द्या. आगामी काळात जिल्ह्याचा चेहरामोहोरा विकासकामाद्वारे बदलण्याची जबाबदारी माझी आहे, असे तटकरे म्हणाले. यावेळी जितेंद्र सातनाक, नरेंद्र भुसाने आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकणच्या मातीचे ऋण विकासाच्या रूपाने फेडायचे आहे - सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 12:02 AM