पाटणा - बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनी राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रांचीत तुरूंगवासाची शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद सतत एनडीए सरकार पाडण्याचा कट करत आहेत. आमदारांशी मोबाईलद्वारे संपर्क साधत आहेत असा आरोप सुशील कुमार मोदी यांनी केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सुशील कुमार मोदी यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.
सुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव हे एनडीएच्या आमदारांना महाआघाडीत सहभागी होण्यासह मंत्रिपदाचं आमिष दाखवत आहेत असा आरोप केला आहे. जेव्हा त्यांनी संबंधित मोबाईल नंबरवर फोन केला तेव्हा तो फोन लालू प्रसाद यादव यांनी स्वतः उचलला असं देखील म्हटलं आहे. लालू प्रसाद यादव तुम्ही तुरुंगात बसून एनडीएचा फोडण्याा कट रचत आहात. यात तुम्हाला यश मिळणार नाही असं देखील सुशील कुमार मोदींनी म्हटलं आहे.
"आम्ही हरलो नाही, आम्हाला हरवलं गेलं; पुन्हा मतमोजणी करा", तेजस्वी यादवांची मागणी
बिहारनिवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांची महाआघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारमधील जनतेचे आभार मानले आहे. तसेच बिहारची जनता आमच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. आम्ही हरलो नसून आम्हाला हरवलं गेलं आहे असं देखील तेजस्वी यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी पोस्टल बॅलेट पुन्हा एकदा मोजण्यात यावीत अशी मागणी केली आहे. "जनादेश महाआघाडीसोबत होता, मात्र निवडणूक आयोगाचा निकाल एनडीच्या पक्षात होता. हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. 2015 मध्ये महाआघाडी स्थापन झाल्यानंतर मते आमच्या बाजूने होती, मात्र भाजपाने सत्ता हस्तगत करण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला" असं देखील तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. उमेदवाराच्या मनातील संशय दूर करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. तेव्हा पुन्हा मतं मोजणं अत्यंत आवश्यक असल्याचं देखील ते म्हणाले.
"एकूण 10 जागांवर गडबड झाली असून येथे पुन्हा मतमोजणी घेण्यात यावी"
एनडीएला एक कोटी 57 लाख मते मिळाली. म्हणजेच 37.3 टक्के मते एनडीला मिळाली आहेत. मात्र महाआघाडीला एक कोटी 56 लाख 88 हजार 458 मते मिळाली. महाआघाडीला 37.2 टक्के मते मिळाली. एनडीए आणि महाआघाडीमध्ये केवळ 12 हजार मतांचा फरक आहे. एनडीए सरकारने दर वचन दिल्याप्रमाणे काम केले नाही, तर आंदोलन छेडले जाईल. सरकारने 19 लाख नोकऱ्या दिल्या नाहीत, बिहारच्या लोकांना औषधे, सिंचन, शिक्षण आणि रोजगार दिला नाही तर महाआघाडी मोठे आंदोलन छेडेल असे तेजस्वी म्हणाले. निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोपही तेजस्वी यांनी केला आहे. एकूण 10 जागांवर गडबड झाली असून येथे पुन्हा मतमोजणी घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.