लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात लातूरच्या मनोहर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महात्मा गांधीजींच्या वेशभूषेत प्रचार करीत शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आपण उभे राहिल्याचे त्यांनी सांगितले.औसा तालुक्यातील मंगरुळ गावचे मनोहर पाटील हे माजी सैनिक आहेत. यापूर्वी त्यांनी ५३ हजार किलोमीटर पायी फिरून जनजागरणाचे काम केले आहे. गावच्या विकासासाठी अनेक आंदोलने केली आहेत. ग्रामपंचायत व पंचायत समितीची निवडणूक लढविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून त्यांनी आंदोलनही केले होते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, बेरोजगारी कायम आहे, मात्र पंतप्रधान केवळ आश्वासने देतात असा आरोप करीत मनोहर पाटील वाराणसीत दाखल झाले.गळ्यामध्ये महात्मा गांधीजीेंचा फोटो, हातात काठी आणि पंचा परिधान करून पाटील अनवाणी पायाने प्रचारभ्रमंती करीत आहेत.प्रचार नव्हे प्रबोधन...निवडणूक ही जिंकण्या व हरण्यापलीकडे प्रबोधनासाठीसुद्धा आहे. जनतेच्या प्रश्नांची चर्चा प्रचारामध्ये झाली पाहिजे. तोच आशय घेऊन मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माझी वेशभूषा आणि माझे विचार घेऊन मी शेतकरी आत्महत्या आणि तरुणांची बेरोजगारी हा प्रश्न समोर आणत आहे, असे मनोहर पाटील यांनी सांगितले.
वाराणसीत मोदींविरोधात लातूरचे पाटील; गांधीजींच्या वेशभूषेत प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 5:09 AM