- सदानंद नाईक
उल्हासनगर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलाविलेल्या शहर कोअर कमिटीच्या बैठकीत शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हे उभे केले. शहर विकासासाठी निधी, भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीत सिंधी समाजाला प्राधान्य, भव्य शहर पक्ष कार्यालय आदींवर चर्चा झाल्याची माहिती पुरस्वानी यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे स्पष्ट बहुमत असतांना, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीसह प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत पक्षाला अपयश आले. याप्रकाराने भाजपाचा करिष्मा शहरातून कमी झाल्याची टीका झाली. भाजपातील ओमी कलानी समर्थक बंडखोर नगरसेवकांनी शिवसेना आघाडीच्या उमेदवारांना मतदान केल्याने, भाजपाच्या सत्तेला ग्रहण लागले. भाजपाला शहरात पुन्हा जुने दिवस आणण्यासाठी शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी यांनी कंबर कसली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शहर कोअर कार्यकारिणीची बैठक पक्षाच्या कार्यालयात बोलाविली होती. या बैठकीला शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, राजेश वधारीया, प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, प्रकाश माखिजा आदीजन उपस्थित होते. शहर विकासासाठी केंद्राकडून विशेष निधी, भुयार गटार योजना, भारत स्वच्छता अभियान यांच्यासह शहरातीलविकास कामासाठी निधीची मागणी केली.
याचबरोबर, अनैतिक धंदे, जुगार अड्डे, ऑनलाईन जुगार, हुक्का पार्लर, अंमली पदार्थाची विक्री यासह हाणामारी, खुनाचा प्रयत्न, चोरी, आदी गुन्ह्यात वाढ झाल्याचे सांगत भाजपा शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले. पक्षाचे भव्य शहर जिल्हा कार्यालय उभारणीला दोन्ही नेत्यांनी पाठिंबा दिला. एकाच वेळी ५०० कार्यकर्ते बसण्याची सुविधा जिल्हा कार्यालय असणार असून २५ जण राहू शकतील अशी व्यवस्था असणार आहे.
शहर भाजपातील वाद चव्हाट्यावर? शहर विकासासाठी निधी, शहरातील कायदा व सुव्यवस्था, भव्य कार्यालय, सिंधी समाजाला मुख्य कार्यकारिणीत प्रतिनिधित्व देणे आदी प्रकरणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. आदींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, पक्षातील नगरसेवक व पक्ष पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा सूर आवळला. आदी प्रकाराने पक्षातील वाद चव्हाट्यावर येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.