कोलकात्यात डावी आघाडी, काँग्रेसचे आज शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 06:20 AM2021-02-28T06:20:27+5:302021-02-28T06:21:19+5:30

विधानसभा निवडणूक, तृणमूल, भाजपला देणार आव्हान

Left Front in Kolkata, Congress demonstrates today | कोलकात्यात डावी आघाडी, काँग्रेसचे आज शक्तिप्रदर्शन

कोलकात्यात डावी आघाडी, काँग्रेसचे आज शक्तिप्रदर्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : विधानसभेच्या निवडणुकांसाठी समझोता झालेल्या पक्ष व काँग्रेस यांच्या आघाडीने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर लगेचच शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. त्यांची संयुक्त सभा उद्या, रविवारी येथील ब्रिगेड परेड मैदानावर होणार असून, त्याद्वारे आपली ताकद दाखविण्याचे या पक्षांनी ठरविले आहे. 


  या आघाडीत इंडियन सेक्युलर फ्रंटही सहभागी होणार असून, रविवारच्या सभेला एक लाखांहून अधिक लोक हजर राहतील, असा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.  
  सलग ३० वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीचा दहा वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पराभव केला. तेव्हापासून माकप, भाकप, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक या डाव्या पक्षांची ताकद कमी होत गेली.  गेल्या निवडणुकीत २९४ पैकी २०९ जागांवर तृणमूल काँग्रेस विजयी झाली. डावे पक्ष व काँग्रेस यांना मिळून ७५ जागा मिळाल्या, पण पुढे आघाडी फुटली आणि दोन्ही पक्षांच्या काही आमदारांनीही पक्षांतर केले. अलीकडे पक्षांतराची लागण तृणमूललाही लागली आणि त्या पक्षाच्या अनेक आमदारांनी राजीनामा देत भाजपची वाट धरली.


ममता यांना मात्र खात्री
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मात्र बहुमत मिळण्याची खात्री वाढत आहे. भाजपने कितीही जोर लावला  तरी त्या पक्षाला बहुमत मिळू शकणार नाही, असे त्या पक्षाचे नेते सांगत आहेत. निवडणूक नीतीतज्ज्ञ व ममता बॅनर्जी यांचे सल्लागार प्रशांत किशोर यांनी तर ममताच मुख्यमंत्री होतील, असे आपण आताच लिहून देतो, तसे होते की नाही ते निकालाच्या दिवशी पाहा, असे म्हटले आहे.


दोन तृतीयांश बहुमत मिळवून भाजपचे डावपेच उधळून लावू
राहुल गांधी, काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन

तुतीकोरिन : अन्य पक्षांचे आमदार फोडून स्वत:चे सरकार स्थापन करणे, असा लोकशाहीला मारक प्रयोग भाजपने सुरू केला आहे. पुदुच्चेरी हे त्याचे ताजे उदाहरण आहे. भाजपचे हे डावपेच उधळून लावण्यासाठी काँग्रेसने केवळ साधे बहुमत मिळवून चालणार नाही. विधानसभा निवडणुकांत दोन तृतीयांश बहुमत मिळाले, तरच भाजपची कारस्थाने थांबविता येतील, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे केले.
 ते म्हणाले की, अरुणाचल प्रदेश, गोवा, मध्यप्रदेश येथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे  भाजपने आपले आमदार फोडले, सरकारे स्थापन केली. राजस्थानातही आपले आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. झारखंडमध्येही सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी
कोणत्याही राज्यात आपल्याला व सहकारी पक्षाला काठावरील बहुमत मिळवण्यात आनंद मानू नये आणि  दोन तृतीयांश बहुमत मिळविण्यासाठी कामाला लागावे. ते झाले, तरच भाजपचा घोडेबाजार थांबविता येईल.
 राहुल गांधी केरळ, तामिळनाडू व पुदुच्चेरी दौऱ्यावर असून, या तिन्ही ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 

Web Title: Left Front in Kolkata, Congress demonstrates today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.