मला माझं काम करु द्या, पार्थ प्रकरणावर बोलण्यास अजितदादांचा नकार; शरद पवार पुण्याला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 12:21 PM2020-08-16T12:21:52+5:302020-08-16T12:25:35+5:30
Parth Pawar: शनिवारी पार्थ पवार यांनी काका श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली
पुणे – गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या पार्थ पवार प्रकरणावर अजितदादांनीही आपलं मौन अद्याप सोडलं नाही. मात्र मला कोणाचीही काही बोलायचं नाही, मला माझं काम करु द्या अशा शब्दात अजित पवारांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. सध्या अजित पवार आणि पार्थ पवार बारामतीत आहेत. त्यामुळे पार्थ पवार पुढे काय करणार? अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
शनिवारी पार्थ पवार यांनी काका श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. पुण्यातील ध्वजारोहन आटोपल्यानंतर अजित पवार बारामतीत पोहचले, रविवारी सकाळपासून अजित पवार बारामतीतील विकास कामांची पाहणी करत आहेत. नियोजित दौऱ्याप्रमाणे अजित पवार बारामतीतील स्थानिक नागरिकांना भेटत असतात. पार्थ प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. मात्र अजित पवार यांनी याबाबत मौन बाळगलं आहे.
श्रीनिवास पवार यांच्या घरी पार्थ पवार यांनी घडलेल्या प्रकरणावर चर्चा केली. आज दिवसभरात अजित पवार(Ajit Pawar) आणि पार्थ पवार यांची चर्चा होऊ शकते. पार्थची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काका श्रीनिवास पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. तर पार्थची आत्या विजया पाटील यांनी पार्थ समजूतदार आहे, शरद पवारांना मी पहिल्यांदाच इतकं चिडलेले पाहिलेले आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पत्नीसह पुण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर पडदा पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पार्थ पवारांची भूमिका राष्ट्रवादीशी विसंगत
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पार्थ पवार प्रकरण गाजत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणावेळी पार्थ पवारांनी जाहीरपणे समर्थन करत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पार्थ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावं अशी मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्या राष्ट्रवादीच्या भूमिकेशी विसंगत असल्याने पार्थ पवार यांना शरद पवारांनी जाहिरपणे फटकारलं होतं.
शरद पवार काय म्हणाले होते?
पार्थ पवार यांच्या मागणीवर शरद पवार(Sharad Pawar) यांनी कठोर भूमिका घेतली होती. याविषयी शरद पवार म्हणाले की, "नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही.
'पार्थ ' यांच्यासाठी सोशल मीडियावर राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते भिडले
राष्ट्रवादीच्या बालेकिल्लयात कार्यकर्त्यांनी पवार कुटुंब एकसंध असल्याचे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले आहे .सोशल मीडियावर त्यासाठी हे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते पार्थ पवार यांच्यासाठी सोशल मीडियावर एकमेकांना भिडले आहेत .पार्थ यांच्याबाबत कधी नव्हे एवढ्या प्रथम भाजप कार्यकर्ते येथे सोशल मिडियावर सक्रिय झालेले दिसून येतात .त्यासाठी लोकसभा निवडणूकीचे पार्थ यांचे संदर्भ वापरले जात आहेत.
पार्थ पवार यांचे मौन तर गाठीभेटी सुरुच
पवार कुटुंबातील तणावाचे वातावरण येत्या दोन दिवसांत निवळेल. पार्थ पवार नाराज होणे हे स्वाभाविक आहे. मात्र, आता ते शांत आहेत. शरद पवार हे त्यांच्या जागेवर योग्य असून पार्थ पवारही त्यांच्या जागेवर योग्य असल्याचे कुटुंबातील सदस्यांकडून सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पवार कुटुंबात वाद असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फेटाळला आहे. पवार कुटुंबात एकोपाच असतो. माध्यमांनी त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये असे मत त्यांनी व्यक्त केले.
एकत्र बसून एका मिनिटात प्रश्न सोडवतील - राजेश टोपे
शरद पवार, अजित पवार आणि पार्थ पवार एकत्र बसून एका मिनिटात हा विषय संपवतील, असे विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
पवार कुटुंबाचा अंतर्गत विषय - देवेंद्र फडणवीस
पवार कुटुंबीयांचा हा अंतर्गत विषय आहे. यात आम्हाला पडायचे नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...याला म्हणतात महासत्ता! आम्ही आमच्या मस्तीत आहोत; संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला
खासदार राजन विचारेंच्या आव्हानाला मनसेचं प्रत्युत्तर; बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा आदरच आहे, पण...