पणजी : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांवर आपला मुळीच विश्वास नाही. या प्रकरणी वाटल्यास चौकशी होऊ द्या. सत्य बाहेर येऊ द्या. धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे स्पष्ट केले.
संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून शरद पवार सध्या गोवा दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांबद्दल विचारले. त्यावर शरद पवार म्हणाले की, ‘काही जणांना बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलेला आहे. या प्रकरणाची वाटल्यास चौकशी होऊ द्या. सत्य काय ते बाहेर येऊ द्या. मुंडे हे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही जबाबदार आहोत.’
दरम्यान, गोवा शिपयार्ड, कारवार येथील नौदलाचा सी बर्ड तळ तसेच तटरक्षक दलाच्या आस्थापनांना भेट देऊन संसदीय समितीने तेथील सज्जतेचा आढावा घेतला. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या येथील कार्यालयाला दिलेली ही धावती भेट होती. केंद्र सरकारने जी शेतकरीविरोधी विधेयके संमत केलेली आहेत त्याचाही शरद पवार यांनी पुन्हा एकदा समाचार घेतला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, आमदार चर्चिल आलेमांव व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.