रत्नागिरी/सिंधुदुर्ग : कोरोनाची स्थिती आटोक्यात आलेली नाही. सध्याच्या लॉकडाऊनचे परिणाम काय होतात, हे पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. लसीकरणासाठी निधी आणि तयारी पूर्ण आहे. लस उपलब्ध होताच १८ ते ४४ या वयोगटासाठीचे लसीकरण तत्काळ केले जाईल, असेही ते म्हणाले.
तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गात झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. या निर्णयाला चारच दिवस झाले आहेत. परिस्थिती अजूनही नियंत्रणात नाही. या निर्णयाचे काय परिणाम दिसतात, ते पाहून पुढील लॉकडाऊनबाबत काय करायचे ते ठरवू, असे ते म्हणाले. ‘मी विरोधी पक्षनेता नाही तसेच मी वैफल्यग्रस्त नाही,’ असा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे यांनी लगावला. यावेळी फडणवीसही सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते.
आपण हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही !
आरोप करणाऱ्या विरोधकांना उत्तरे देण्यासाठी नाही, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. चार तासांचा दौरा असला, तरी आपण फोटो सेशन करण्यासाठी हा दौरा काढलेला नाही, असा चिमटाही त्यांनी भाजप नेत्यांना काढला. आपण हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही तर जमिनीवर उतरलो आहोत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता पंतप्रधानांना लगावला आहे.
विरोधी पक्षासारखे बोलणार नाही
पंतप्रधान गुजरातचा दौरा करतात, तेथे लगेच मदत मिळते, पण महाराष्ट्राला मिळत नाही, असा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला असताना ठाकरे यांनी मात्र पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका टाळली. मी विरोधी पक्षासारखे बोलणार नाही, जबाबदारीने बोलणार. पंतप्रधान जरी महाराष्ट्रात आले नसले, तरी ते मदत दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.