>> मुकेश माचकर
विशेष सूचना : हे पत्र संपूर्णपणे काल्पनिक आहे. ते वाचल्यावर काहीजणांना एका प्रख्यात उद्योजकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या माफीपत्राची आठवण येईल. त्या पत्रात त्या उद्योजकाने कंपनीचे कर्मचारी, भागधारक आणि कुटुंबीयांना अंधारात ठेवून केलेल्या काही व्यवहारांबद्दल त्यांची माफी मागितली होती आणि त्यांच्यापैकी कोणाचंही काहीही नुकसान होणार नाही, याची काळजी घेतल्याचंही स्पष्ट केलं होतं... कारण, तो उद्योजक होता, प्रामाणिक होता आणि दबावापोटी घेतलेले निर्णय त्याने कोणाचं नुकसान व्हावं म्हणून घेतलेले नव्हते. आपल्यामुळे इतरांचं नुकसान होऊ नये, यासाठी आयुष्याला सोडचिठ्ठी देण्याचं धाडस त्याच्यात होतं.
इथलं पत्र एका पक्षबदलू राजकारणी नेत्याने मतदारांना उद्देशून लिहिलेलं आहे, म्हटल्यावर ते शंभर टक्के काल्पनिक असणार, हे वेगळं सांगायची गरज नाही... आता वाचा पत्र.
प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो,
निवडणुकीच्या काळात (आणि फक्त तेव्हाच) मी आपल्याला साद घालतो, हे आपण जाणताच. पण, ही साद काही मत मागण्यासाठी नाही (अजून उमेदवारी डिक्लेअर व्हायची आहे), मी (पुन्हा एकदा) पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल आपल्याला विश्वासात घेणं हे मला गरजेचं (‘वाटत नाही’ असं सरावाने लिहिलं होतं इथे ते खोडून ‘वाटतं’ असं लिहिलंय) वाटतं आणि अशी पत्रं लिहिली की मतदारांशी एक वेगळाच भावनिक कनेक्ट निर्माण होतो, लोकप्रतिनिधी आपल्याला काही किंमत देतो, असा गैरसमज त्यांच्या मनात निर्माण होतो, असं मला प्रसिद्धी सल्लागार कंपनीने सांगितलेलं असल्याने मी हे पत्र लिहितो आहे.
बंधू आणि भगिनींनो, आपल्याला आठवत असेल, माझ्या राजकीय-सामाजिक आयुष्याची सुरुवात तीर्थस्वरूप दिवंगत बाईंच्या पक्षापासून झाली (दहावीनंतर उनाडक्या करत फिरत असताना २० चहा, ५ पाकिटं सिगरेटी, १५ मस्कापाव, १० ऑम्लेट पाव यांचं बिल मागितलं म्हणून इराण्याच्या हॉटेलात राडा घालून त्याला ‘ग्राहकशोषणविरोधी आंदोलना’चं स्वरूप दिलं होतं, तो दिवस काही लोक माझ्या कारकीर्दीचा पहिला दिवस गृहीत धरतात. मी म्हणतो, निंदकाचे घर असावे शेजारी). पहिल्या निवडणुकीत मला निवडून देणारे एक वयोवृद्ध मतदार मला नुकतेच म्हणाले, त्या काळात आम्ही म्हणायचो की बाईंनी एखाद्या दगडाला शेंदूर लावला तरी आम्ही त्याला डोळे झाकून निवडून देऊ. बाई आमचं बोलणं इतकं सिरीयसली घेतील आणि तुला उभा करतील, असं वाटलं नव्हतं... आम्हीही आमचा शब्द खरा करून तुला निवडून दिलं.
असं जनतेचं प्रेम आणि विश्वास मला पहिल्या निवडणुकीपासून लाभलेलं आहे. त्याचं मी वेळोवेळी सोनं केलं आहे (सध्या पाव किलो अंगावर आहे, अर्धा किलो बायकोच्या अंगावर आहे, आणखी पाव किलो जरा वेगळ्या अंगावर आहे, पोराटोरांमध्ये मिळून दोनेक किलो असतील, बाकी ठिकठिकाणी साठवून, पुरून किती ठेवलंय ते वहीत बघूनच सांगावं लागेल.) आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल, सक्रीय राजकारणात येण्याआधी मी अनेक उद्योग केले. रिक्षा चालवली, बुर्जीची गाडी चालवली, रस्त्यावर प्लॅस्टिकचे कंगवे वगैरे विकले, घड्याळं, कॅल्क्यूलेटर, सीडी विकल्या. तेव्हा येणारा जाणारा कोणीही मला ‘काय रे पक्या’ म्हणून हाक मारायचा. मी चाळीतल्या दहा बाय दहाच्या खोलीत राहायचो. वेळोवेळी केलेल्या जनआंदोलनांमुळे (उदाहरणार्थ, रिक्षाभाडं मीटरप्रमाणे आकारायला सांगणाऱ्या ग्राहकांना चोपून काढणे, बुर्जीच्या गाडीला जागा न देणाऱ्या आधीपासूनच्या गाडीवाल्याच्या डोक्यात गरम तेलाचा झारा हाणणे, सीडीविक्रीच्या माध्यमातून तरुणांना लैंगिक शिक्षण देण्याच्या व्रताआड येणाऱ्या पोलिसाला कानफटवणे, गोरगरिबांना स्वस्त दरात घड्याळं, कॅल्क्युलेटर मिळवून देण्यासाठी प्रसंगी तुरुंगवास पत्करणे) माझं कार्य तीर्थस्वरूप बाईंच्या पक्षाच्या नजरेत भरलं आणि त्यांनी मला पाच पेट्यांचा रेट सुरू असताना तीन पेट्यांमध्ये तिकीट दिलं.
तिथून पुढचा माझा सगळा संघर्षमय जीवनपट तुम्हाला माहितीच आहे. पहिल्या निवडणुकीला मी जनसेवेचा निर्धार केला आणि मताची किंमत मोजण्याचा परिपाठ आजतागायत पाळलेला आहे. दर पाच वर्षांनी महागाई निर्देशांकानुसार तो रेट इमानदारीत वाढवलेलाही आहे. आज निवडणूक आयोगाची एवढी करडी नजर (ठरावीक लोकांवर, साहेबांच्या हेलिकॉप्टरांतून बाहेर पडणाऱ्या बॅगांवर नव्हे) असतानाही घरटी मतांच्या हिशोबात आपलं पाकीट पोहोचल्याशिवाय राहात नाही. मी आज मुंबईत पाच फ्लॅट, गावी दहा एकरात बंगला, लंडन, न्यूयॉर्क, दुबई, थायलंडमध्ये फ्लॅट, पेट्रोल पंप, हॉटेलं, मॉल, रिअल इस्टेट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये निव्वळ स्वकष्टाच्या बळावर, घाम गाळून (प्रसंगी रक्त सांडून- अर्थात इतरांचं) प्रगती केली आहे, पण, त्यात मी तुम्हालाही सहभागी करून घ्यायला विसरलेलो नाही. आज आपल्या लेटरच्या बळावर अनेक दहावी नापास पोरांना डिग्रीहोल्डरपेक्षा भारी नोकऱ्या लागल्या आहेत. आपण, व्यायामशाळा, कॅरम क्लब, उत्सव मंडळं, साई पालखी पथकं, वारकरी पथकं, गोविंदा पथक, भंडारा मंडळं, मंदिर जीर्णोद्धार मंडळं, अमुकज्योत, तमुकरथ, ढमुकविजय अशा सोहळ्यांमधून तरुणांना सक्षम करण्यासाठी खूप पैसे खर्च करतो. आपल्याला हात पुसायला टॉवेल देणाऱ्या पोऱ्यापासून बॉडीगार्डपर्यंत सगळ्यांना आपण नगरसेवक, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य बनवून लाइफमध्ये सेटल करून टाकलंय.
आता पाच वर्षं आपल्याकडे पॉवर नव्हती, तरी मी हे सगळं मॅनेज करत आलेलो आहे. तीर्थस्वरूप बाईंनी, नंतर तीर्थस्वरूप साहेबांनी आपल्याला सगळं काही दिलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. पण, वेळोवेळी पक्षासाठी निधी उभारून, पक्षाचे कार्यक्रम पुढे चालवून, निवडणुकांसाठी खोके काढून देऊन मी ऋणमुक्त होण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे, याची नम्र जाणीव करून द्यावीशी वाटते, आपण असेही कुणाचे उपकार ठेवत नाही. नंतर जाण ठेवण्याची भानगड कोण करत बसणार?
आम्ही हे सगळं कुणासाठी करतो? पब्लिकसाठी करतो. आता पब्लिक सरंजामदारीच्या, घराणेशाहीच्या, अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनाच्या आणि निष्प्रभ नेतृत्वाच्या राजकारणाला वैतागलेली आहे (कॉपी बरोबर केलेत ना सगळे जड शब्द? नंतर घोटाळा नको, साला इकडे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे), हे लक्षात घेऊन मायबाप मतदारांच्या इच्छेचा आदर राखून मी, माझी बायको, दोन मुलं, तीन भाऊ, दोन पुतणे, तीन साडू आणि तीन भाचे असे सगळेजण यापुढे घराणेशाही आणि भ्रष्ट कारभाराच्या पक्षाला तिलांजली देऊन जनसेवेचं कंकण हाती बांधलेल्या सत्ताधारी पक्षाच्या (‘वळचणीला जाऊन बसत आहोत’ हे खोडलेलं आहे) देशसेवेच्या यज्ञात राजीखुशीने सहभागी होत आहोत (त्यासाठी कोणीही कसलाही अटकेबिटकेचा दबाव आणलेला नाही), याची आपण नोंद घ्यावी आणि येत्या निवडणुकांमध्ये (आधीच्या पक्षाची) घराणेशाही नेस्तनाबूत करून टाकावी, ही नम्र विनंती.
ता. क. : पाकीट नेहमीप्रमाणे पोस्त होईल आणि रेटमध्ये घसघशीत वाढ झालेली असेल, याबद्दल निश्चिंत असावे. आता तर आपण पॉवरमध्ये आहोत.