पटना – लोकजनशक्ती पार्टीत उभी फूट पडल्यानंतर आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर चिराग पासवाननं काका पशुपती कुमार पारसविरोधात मोर्चा उघडला आहे. तडजोडीचा प्रयत्न करण्यात अयशस्वी झाल्यानंतर चिरागनं पारस यांच्यावर पक्ष आणि कुटुंबाच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपा केला आहे.
मंगळवारी दुपारी ट्विट करून त्यांनी एक पत्र शेअर केला. यात चिरागनं त्याच्या चुलत भाऊ खासदार प्रिंस पासवान यांच्याशी निगडीत एक प्रकरण समोर आणलं आहे. ज्यात महिलेने प्रिंस यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. चिरागच्या पत्रानुसार, स्वाती नावाची एक महिला एलजेपी पक्षाचं काम करत होती. तिने प्रिंस पासवान यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करून ब्लॅकमेल करत होती. चिरागने या मुद्यावरून पारस यांचा सल्ला मागितला परंतु त्यांनी लक्ष दिलं नाही.
चिरागनं पत्रात लिहिलंय की, मोठा भाऊ असल्याच्या नाते मी प्रिंसला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला होता कारण यातून खरं आणि खोटं समोर येऊन दोषींना शिक्षा होईल. या महत्त्वाच्या विषयावर पारस यांनी कोणताही सल्ला दिला नाही. हा मुद्दा पार्टीसोबतच कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विषय होता. पार्टीत फूट पडल्यानंतर चिरागनं पत्राद्वारे स्पष्ट केले की, पारस यांनी समस्या सोडवण्याऐवजी आणखी वाढवली. परंतु त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. इतकचं नाही तर रामविलास पासवान जिवंत असताना पारस यांच्या वागण्यात बदल झाला होता. चिराग पासवान यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं तेव्हाच पारस यांनी पक्षाविरोधात काम करण्यास सुरूवात केली.
'राजद'च्या आमदारानं सांगितलं राजकीय 'गणित'
राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई बिरेंद्र यांनी चिराग पासवान यांच्यासमोर एक अनोखी ऑफर ठेवली आहे. चिराग पासवान यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत यावं आणि त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा द्यावा. सध्याची परिस्थिती दोन युवा नेत्यांनी एकत्र येण्याची आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत करुन चिराग पासवान यांनी केंद्रात राहून दिल्लीतलं राजकारण सांभाळावं, अशी ऑफर राजद आमदार भाई बिरेंद्र यांनी दिली आहे.
पशूपती पारस यांच्या बंडखोरीनं चिराग पडले एकटे
लोकजनशक्ती पक्षाच्या (एलजीपी) बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड केलेले पशूपतीकुमार पारस हे पक्षनेते चिराग पासवान यांचे वडील आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू आहेत. बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड करताच पारस यांनी ‘मी पक्ष फोडलेला नाही, तर वाचवला आहे’, अशी प्रतिक्रिया पत्रकारांकडे व्यक्त केली होती. पारस हे हाजीपूरचे खासदार आहेत. या बंडानंतर त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा केली.