मुंबई - आज मुंबईत होत असलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा आज मुंबईत सुरू आहे. या सोहळ्याला राज्य सरकारमधील मंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यामध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसह सचिन वाझे प्रकरणावर राज्य सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी मोठं विधान केले आहे. (Ashok Chavan says, "It is Rane's habit to ask for the resignation of the Chief Minister, Sachin Waze.")
या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेल्या अशोक चव्हाण यांनी भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना टोला लगावला आहे. सचिन वाझे प्रकरणानंतर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या केलेल्या मागणीबाबत विचारले असता अशोक चव्हाण म्हणाले की, नारायण राणे काही झाले की मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागतात. ती त्यांची नित्याची सवय झालेली आहे. त्यांना मुख्यमंत्री बनण्याची घाई झालेली आहे.
यावेळी सचिन वाझे प्रकरणाबाबत अशोक चव्हाण म्हणाले की, या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. ते कुणालाही पाठीशी घालणार नाहीत. तिन्ही पक्षांचीही तशीच मागणी आहे. तसेच सरकारमध्येही कुठल्याही प्रकारची अस्वस्थता नाही आहे. तसं पाहायला गेले तर सचिन वाझे खूप लहान माणूस आहे. या प्रकरणानी निष्पक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी. तसेच जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र या प्रकरणात सध्या भाजपा ट्रायल सुरू आहे, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.
दरम्यान, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020' (Lokmat Maharashtrian of the year award 2020) सोहळ्याला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आले होते. त्यावेळी त्यांनी मंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीचे कारण सांगितले आहे. पोलीस महासंचालकांना पोलीस आयुक्त पदावर आणण्यात आले आहे. परमबीर सिंग यांना मोहरा बनविल्याचे आरोप विरोधक करत आहेत. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच खुलासा केला आहे. सचिन वाझे प्रकरणात पोलीस आयुक्त यांची बदली ही प्रशासकीय बदली नाही. ती कारवाई आहे. चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे आल्या. अक्षम्य अशा त्या गोष्टी आहेत. त्या समजल्याने या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे. चौकशीमध्ये कोणतीही बाधा येऊ नये, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.