नवी दिल्ली - देशात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना राजधानी दिल्लीमध्येही बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. मात्र केंद्र आणि दिल्ली सरकारच्या नियोजनामुळे लवकरच दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली होती. दरम्यान, कोरोनाकाळातील मदतीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे आभार मानले आहेत. (Delhi CM Arvind Kejriwal thanked Narendra Modi & Amit Shah for help in Corona era)
कोरोनाकाळात नरेंद्र मोदी, अमित शाहा आणि डॉ. हर्षवर्धन दिल्ली सरकारसोबत उभे राहिले, अशा शब्दात केजरीवाल यांनी त्यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदींना कधीही फोन केला तरी ते मदतीसाठी तयार असत. अमित शाहा यांनी दिल्लीतील रुग्णालयांत जाऊन काम पाहिले. दिल्लीतील खासदारा आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनीही मदत केली, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. आज दिल्लीत झालेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२० (Lokmat Maharashtrian Of The Year २०२०)या कार्यक्रमाला अरविंद केजरीवाल यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.
दिल्ली सरकारने कोरोनाविरोधातील लढाईत आघाडीच्या मोर्चावर राहून काम करणाऱ्या आपल्या कुठल्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपये सानुग्रह मदत देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीतील कोरोनाकाळातील मदतीसाठी मी केंद्र सरकारचे आभार मानतो. सर्वांनी एकत्र येत एकदिलाने काम केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व विभागांनी मिळून या साथीला रोखण्यात यश मिळवले. त्यामुळेच आता दिल्लीत कोरोनाचे रुग्ण कमी आहेत.