मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी(Mukesh Ambani Bomb Scare) आढळली होती, या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना NIA कडून अटक केली आहे. स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यामागे सचिन वाझेंचा(Sachin Vaze) हात असल्याचा संशय NIA ला आहे, त्याप्रकारे NIA अधिकाऱ्यांचा तपास सुरू आहे, परंतु या घटनेमुळे विरोधकांनी ठाकरे सरकारची कोंडी केली आहे. अशातच मुंबई पोलीस दलावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार(Lokmat Maharashtrian of the Year Awards) सोहळ्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. मुंबई पोलीस(Mumbai Police) दलाने कोरोना काळात अतिशय उत्तमरित्या काम केले आहे, पोलीस दिवसरात्र मेहनत घेत होते, देशात महाराष्ट्र पोलिसांची चांगली प्रतिमा आहे. काही अधिकाऱ्यांच्या हातून चुका होतात, त्या यापुढे होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल असं सांगत त्यांनी सचिन वाझे प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं, परंतु या प्रकरणामुळे आपण राजीनामा देणार का? या प्रश्नावर त्यांनी थेट नाही असं उत्तर दिलं, माझा राजीनामा घेतला जाणार नाही, घटना घडत राहतात असं देशमुखांनी म्हटलं आहे.
त्याचसोबत तुमच्या पक्षातला कोणता नेता यावेळी गृहमंत्री पदावर असता तर तुम्हाला आवडलं असतं? अजित पवार(Ajit Pawar) की जयंत पाटील?(Jayant Patil) या प्रश्नावर अनिल देशमुख म्हणाले की, दोन्ही नेते ज्येष्ठ नेते आहे. दोघांनी उत्तम काम केलेले आहे. अजित पवार आणि जयंत पाटील दोघांनीही उत्तम पदाच काम केलं असतं. आमच्या पक्षात सर्वच उत्तम नेते आहेत असं उत्तर त्यांनी दिलं, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना किती गुण द्याल असं विचारलं असता त्यांनी १० पैकी ५ गुण देऊ असं अनिल देशमुख म्हणाले तर स्वत:ला किती गुण द्याल असा प्रश्न विचारला असता, मला जनताच गुण देईल असं प्रत्युत्तर दिलं.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे. अशातच राज्यात गृहमंत्री बदलावर चर्चा सुरु झाली होती, अनिल देशमुख यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांना या पदावरून हटवावं अशी मागणी शिवसेनेच्या(Shivsena) एका गटाने केली होती, मात्र अनिल देशमुख यांची सचिन वाझे प्रकरणात कोणतीही चूक नाही, त्यांचा राजीनामा घेणार नाही असं सांगत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली होती.
सचिन वाझे यांना निलंबित केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठका सुरू होत्या, त्यानंतर बुधवारी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग(Parambir Singh) यांची उचलबांगडी करण्यात आली, त्यांच्या जागी हेमंत नगराळे(Hemant Nagrale) यांना मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली. सचिन वाझे प्रकरणात पोलीस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. NIA ने वाझे यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शोध घेत आहेत, लवकरच या प्रकरणात अन्य बड्या अधिकाऱ्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.