मुंबई : ‘बॉस’च्या आदेशानंतर शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराला लागण्याचा काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मनसुब्यावर शिवसैनिकांनीच पाणी फेरले आहे. प्रचार करायचा असेल तर आधी काँग्रेसचा राजीनामा द्या, अशी भूमिका स्थानिक शिवसैनिकांनी घेतल्याने कोळंबकर यांना प्रचारापासून लांब राहावे लागणार आहे.दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी वडाळा विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक २०१ आणि १७७ मध्ये प्रचार फेरी काढली. या वेळी आमदार कालिदास कोळंबकर यांच्या जनसंपर्क कार्यालयालाही शेवाळे यांनी भेट दिली. कोळंबकर यांनी शेवाळे यांना शुभेच्छा देत आपला पाठिंबाही व्यक्त केला. पुढील प्रचारात कोळंबकर सहभागी होणार याची कुणकुण लागताच स्थानिक शिवसेना नेत्यांनी त्यास तीव्र विरोध दर्शविला. माजी महापौर आणि स्थानिक नगरसेविका श्रद्धा जाधव आणि अन्य शिवसेना नेत्यांनी कोळंबकर यांच्या प्रचारातील सहभागास आक्षेप घेतला. कोळंबकर प्रचारात सहभागी होणार असतील तर आम्ही जातो, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतल्याने राहुल शेवाळे यांची मात्र अडचण झाली.कोळंबकर यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही लावला होता. आपले नवे ‘बॉस’ म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर शिवसेनेच्या राहुल शेवाळेंचा प्रचार करणार असल्याचेही कोळंबकर यांनी जाहीर केले होते. काँग्रेसमध्ये असलेले पण भाजपमध्ये जाऊ इच्छिणारे कोळंबकर शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराची तयारी दाखवत असताना स्थानिक शिवसेना नेते मात्र विरोधाची भूमिका घेत आहेत. कोळंबकर हे अद्याप काँग्रेसमध्येच आहेत़ ते भाजपच्या गळ्यातील ताईत बनण्याचा प्रयत्न करत आहेत़ त्यामुळे त्यांनी आधी भूमिका स्पष्ट करावी, असे काही शिवसैनिकांचे म्हणणे आहे़२०१७ पर्यंतच्या महापालिका निवडणुकीपर्यंत कोळंबकर यांचा भाजपमध्ये येण्याची कोणतीही चर्चा नव्हती़ त्या वेळी त्यांनी त्यांचे तीन शिलेदार सुनील मोरे यांच्या पत्नी, महेंद्र मुणगेकर यांच्या पत्नी व जनार्दन किरदत यांना उमेदवारी दिली होती़ मात्र त्या निवडणुकीत भाजपला ३६ हजार, शिवसेनेला ३२ हजार तर काँग्रेसला २६ हजार मते मिळाली होती़ भविष्यात आपलाही पराभव होऊ शकतो या भीतीने ते भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही बोलले जात आहे़ २०१४ साली कोळंबकर यांच्याविरोधात मिहिर कोटेचा भाजप उमेदवार होते. कोटेचा आणि कोळंबकर यांच्यात अवघ्या ८०० मतांचे अंतर होते. पराभवानंतरही कोटेचा यांनी वडाळा विधानसभा मतदारसंघात अनेक कामे केली़ पक्ष वाढविण्याचे काम केले़अनेक स्पर्धा आयोजित केल्या़ पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला़ कोटेच्या यांच्या वाढत्या प्रभावामुळे कोळंबकर आगामी विधानसभा निवडणुकीत आपली जागा राखून ठेवण्यासाठी भाजपच्या जवळ जात आहेत, अशीही विभागात चर्चा आहे़ ‘वडाळा विधानसभा मतदारसंघातून युतीच्या उमेदवाराला एक लाख मते मिळतील. यातही मोदी यांच्या विजयासाठी कोणाला प्रचार करायचा असेल तर त्यांनी जरूर करावा. आम्ही त्यांचे स्वागतच करतो, असे कोटेचा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वडाळा येथे प्रचारफेरी सुरू असताना कोळंबकर यांच्याशी अचानक भेट झाली़ त्यांनी मला शुभेच्छा दिल्या़ तुमचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही व्यक्त केला, अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली़
>भाजप नेत्यांच्या प्रचाराच्या सूचनावडाळ्याचे काँग्रेस आमदार कोळंबकर भाजपच्या वाटेवर आहेत. जागा मित्रपक्षाकडे असूनही राज्यातील भाजप नेत्यांनी कोळंबकर यांना ‘मदत’ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कोळंबकर कामालाही लागले. मात्र, भविष्यातील स्थानिक समीकरण लक्षात घेत शिवसेना नेत्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेना उमेदवाराचीच अडचण होत असल्याचे बोलले जात आहे.>सेना, भाजप कार्यकर्ते सक्षमकोळंबकर यांना शिवसेना-भाजप युतीचा प्रचार करायचा असेल तर त्यांनी आधी काँग्रेसचा राजीनामा द्यावा. सेना व भाजप कार्यकर्ते प्रचारासाठी आहेत़ तेव्हा काँग्रेसचा राजीनामा मगच प्रचार, ही आमची भूमिका असल्याचे श्रद्धा जाधव यांनी सांगितले.