- अतुल कुलकर्णी/ यदु जोशी
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांनी देव पाण्यात ठेवलेले असतानाच काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी व भाजपा-शिवसेना युतीत अंतर्गत धुसफुस सुरू आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेने आघाडीत तणाव निर्माण झाला आहे, तर जालन्यात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद अजून मिटलेला नाही.अहमदनगरच्या जागेवरून आधीच काँग्रेस-राष्टÑवादीत रस्सीखेच झाली असताना विखेंच्या टीकेने या वादात ठिणगी पडली. शरद पवार यांनी मात्र विखेंचे म्हणणे फार गांभीर्याने घेऊ नका, असे सांगितले असले तरी राष्टÑवादीचे नेते दुखावले गेले आहेत. काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीतही या वादाचे पडसाद उमटले. विखेंनी ऐन निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेमुळे एका गटाने नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब थोरात यांनी विखेंच्या विरोधात भूमिका घेतली, तर माणिकराव ठाकरे यांनी विखेंची पाठराखण केली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विखे-थोरात यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. विरोधी पक्षनेतेपदाबाबत पक्षश्रेष्ठीच योग्य तो निर्णय घेतील असे सांगून त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेतली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही झाल्या प्रकाराबद्दल बैठकीत खेद व्यक्त केल्याचे समजते.माढा मतदारसंघाचा घोळ कायममाढा मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष उमेदवारांवरुन गोंधळात पडले असल्याचे चित्र आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे आणि रणजितसिंह मोहिते पाटील अशी तीन नावे भाजपाकडून चर्चेत आहेत. मोहिते यांच्या नावाचा दोन्हीकडे विचार सुरू आहे. देशमुख यांचे नाव शेवटी पक्के होईल, असे अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.विजयसिंह मोहिते किंवा रणजितसिंह यांच्यापैकी एकाला संधी देण्याचा राष्ट्रवादीचा विचार आहे. मोहितेंना लढवायचे नसेल तर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शब्द वापरायला सांगून संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी द्यावी, असा प्रयत्न आहे. शिंदे हे करमाळामधून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. दोन्हीकडे माढाचा तिढा सुटण्याऐवजी वाढला आहे.बारामतीमध्ये भाजपाही उमेदवार ठरवू शकलेली नाही. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर लढावे, असा भाजपाचा आग्रह आहे. पुण्यात गोंधळाची परिस्थिती आहे. भाजपाकडून पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव मागे पडले असताना विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे म्हटले जात होते. तेथे राज्यसभा सदस्य संजय काकडे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष आहे. ते भाजपासोबत राहावे यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. काकडे काँग्रेसमध्ये जाणार असे त्यांनी जाहीर केले असले तरी काँग्रेसने तशी काहीही घोषणा केलेली नाही.युती । वादाचे दोन मतदारसंघमुंबईत उत्तर-पूर्व : भाजपाचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना पुन्हा संधी दिली तर त्यांचा प्रचार करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहे. त्यामुळे सोमय्या यांची उमेदवारी अंतिम करण्यात भाजपाला अडचणी येत आहेत.जालना : सेनेचे खोतकर काँग्रेसकडून?भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात दिलजमाई झाल्याचे वृत्त असतानाच या मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज खोतकर यांची भेट घेतल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले. दोन दिवसांत तुम्हाला गुड न्यूज मिळेल या सत्तार यांच्या वाक्याचा अर्थ खोतकर काँग्रेसकडून निवडणूक लढणार, असा घेतला जात आहे.