पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राज्यभर सभा घेणाऱ्या, 'ए लाव रे तो व्हिडीओ' म्हणत मोदींवर आरोपांचे बाण सोडणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज भाजपाने 'बघाच तो व्हिडीओ' म्हणत 'जशास तसं' उत्तर दिलं. नरेंद्र मोदी विरोधात असताना काय बोलायचे आणि सत्तेत आल्यावर त्यांची भूमिका कशी बदलली, त्यांनी केलेले दावे कसे खोटे आहेत, नोटाबंदीने देश कसा खड्ड्यात गेला, देशभरात हुकूमशाही कशी सुरू आहे, या संदर्भातील व्हिडीओ राज ठाकरे यांनी अनेक सभांमध्ये दाखवले होते. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर, टीका केली म्हणून मुस्कटात मारणाऱ्यांनी आम्हाला मुस्कटदाबी शिकवू नये, अशी चपराक मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावली आणि सोबत आकडे आणि व्हिडीओही दाखवले.
६ एप्रिल ते २६ एप्रिलपर्यंत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या. या २० दिवसांत २,६०० मिनिटं इलेक्ट्रॉनिक मीडियावर राज ठाकरे दिसत होते. म्हणजेच, दिवसभरात १३० मिनिटं त्यांचं दर्शन घडत होतं. जर मीडियावर भाजपाचा किंवा सरकारचा दबाव असता तर हे झालं असतं का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला. त्यानंतर स्क्रीनवर तीन व्हिडीओ दाखवण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका मराठी वृत्तवाहिनीला प्रवेश बंदी केल्याची बातमी त्यात होती. उर्वरित दोन व्हिडीओंमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी ट्रोलर्सना केलेली मारहाण होती. राज ठाकरेंवर टीका केली म्हणून मनसैनिकांनी काही जणांना घरी जाऊन मारहाण केल्याचे प्रकार काही दिवसांपूर्वी घडले होते. किंबहुना, राज ठाकरे यांनीच जाहीर कार्यक्रमात आपल्या सैनिकांना, ट्रोलर्सना ठोकून काढण्याचे आदेश दिले होते. तोच आधार घेत, दुसऱ्यावर आरोप करणाऱ्याने आधी स्वतःकडे पाहावे, असा टोला शेलारांनी लगावला.
कुठे गेले हे शिलेदार?
मनसेच्या स्थापनेवेळी जे राज यांच्यासोबत होते, त्यांच्यापैकी अनेक शिलेदारांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यावरूनही भाजपाने राज यांना लक्ष्य केलं. शिशीर शिंदे, वसंत गीते, प्रवीण दरेकर, श्वेता परुळेकर, अतुल चांडक, दगंबर कांडरकर, दीपक पायगुडे, शिरीष पारकर यांच्यापैकी कुणीही राज ठाकरेंसोबत राहिलेले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
मित्रा, तू खरंच चुकलास!
जे चुकतंय त्यावर टीका व्हायलाच हवी. त्यामुळे टीकेला विरोध करायचं कारण नाही. आजची सभा हा प्रतिहल्ला किंवा प्रतिशोध नाही. पलटवार किंवा व्यक्तिगत आरोपही आम्ही करणार नाही. केवळ सत्य जनतेसमोर मांडण्यासाठी ही सभा असल्याचं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. कुठलेही ठोस पुरावे नसताना, माहितीची खातरजमा न करता, भाषणं तोडून-मोडून दाखवत राज यांनी मोदी सरकारवर आरोप केल्याचं त्यांनी नमूद केलं आणि 'मित्रा तू खरंच चुकलास', अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. राज ठाकरे आणि आशिष शेलार हे राजकीय विरोधक असले तरी चांगले मित्र असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे.