मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादीनं लोकसभा निवडणुकासाठी उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र सत्ताधारी भाजपानं अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून जोरदार इनकमिंग सुरू आहे. तरीही त्यांच्याकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात न आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या होलाष्टक सुरू असल्यानं भाजपाकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जात नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.होळीच्या आधीचे आठ दिवस होलाष्टक असतं. या काळात शुभ कार्य वर्ज्य मानलं जातं. त्यामुळेच भाजपाकडून उमेदवार यादी जाहीर केली जात नसल्याची चर्चा आहे. होलाष्टक संपल्यावर भाजपाकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाऊ शकते. भाजपा पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कापणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपाचे सध्या 22 खासदार आहेत. यंदा भाजपा राज्यात 25 जागा लढवणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपामध्ये जोरदार इनकमिंग झाल्यानं कोणकोणत्या विद्यमान खासदारांचा पत्ता कापला जाणार आणि त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसनं राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादीनं दोन याद्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीनं उमेदवारांच्या यादीत आघाडी घेतली असली, तरी त्यांना बिघाडीचा सामनादेखील करावा लागला आहे. याचा थेट फायदा भाजपाला झाला आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर सोलापूरातील राष्ट्रवादीचे मातब्बर नेते रणजितसिंह मोहिते-पाटील आज भाजपवासी होणार आहेत. भाजपानं आतापर्यंत उमेदवारांची यादी जाहीर न केल्यानं त्यांना बंडखोरीचा फटका बसलेला नाही.
भाजपाची उमेदवार यादी अडकली शुभ-अशुभाच्या चक्रात?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 10:30 AM