कोलकाता: देशात सगळीकडे मतदान शांततेत पार पडलं. फक्त पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचार झाला. या हिंसाचाराला केवळ तृणमूल काँग्रेस जबाबदार आहे, अशा शब्दांत भाजपा अध्यक्ष अमित शहांनी तृणमूलवर शरसंधान साधलं. आम्ही देशभरात निवडणूक लढवली. पण तिथे हिंसाचार झाला नाही. कारण तिथे तृणमूल नाही. फक्त पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. कारण केवळ याच राज्यात तृणमूल सत्तेत आहे, अशी टीका शहांनी केली. काल शहांच्या कोलकात्यातील रोड शोमध्ये मोठा हिंसाचार झाला. त्यामुळे भाजपाला रोड शो अर्धवट सोडावा लागला. यानंतर आज शहांनी पत्रकार परिषद घेत तृणमूलवर शरसंधान साधलं. अमित शहांनी पत्रकार परिषदेत तृणमूलसह राज्यातील निवडणूक आयोग आणि पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला. 'तृणमूल काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच आता भाजपाला रोखण्यासाठी हिंसेचा वापर होत आहे. काल संध्याकाळी भाजपाचा रोड शो होता. त्याआधी तृणमूलच्या गुडांनी भाजपाचे पोस्टर फाडले. पण पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. निवडणुकीपूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. पश्चिम बंगालमध्ये तशी कोणतीही कारवाई झाली नाही. निवडणूक आयोगानंदेखील यावर आक्षेप घेतला नाही. आयोगाची ही भूमिका दुटप्पी आहे,' अशा शब्दांत शहा बरसले.
'भाजपाने तर देशभर निवडणूक लढवलीय; पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार दीदींनीच घडवला!'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 11:40 AM