नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत 303 जागांवर विजयी मिळवणाऱ्या भाजपानं मुस्लिमबुहल मतदारसंघांमध्ये उत्तम कामगिरी केल्याचं आकडेवारीवरुन समोर आलं आहे. मुस्लिमांचं प्रमाण जास्त असलेल्या 90 जिल्ह्यांमधील निम्म्यापेक्षा जास्त जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. अल्पसंख्यांकविरोधी असल्याचा आरोप कायम भाजपावर होत असतो. त्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी भाजपाला दिलासा देणारी आहे. अल्पसंख्यांकांचं प्रमाण अधिक असलेले जिल्हे सामाजिक, आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर असून तिथल्या मूलभूत सोयी सुविधांची स्थितीदेखील फारशी चांगली नाही. यातील 79 लोकसभा मतदारसंघांमधील 41 जागांवर भाजपानं यश मिळवलं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपाच्या जागा सातनं वाढल्या. तर या मतदारसंघांमध्ये काँग्रेसची कामगिरी खालावली. गेल्या निवडणुकीत 79 पैकी 12 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला होता. यंदा काँग्रेसला अवघ्या 6 जागा जिंकण्यात यश मिळालं. यंदा लोकसभा निवडणुकीत 27 मुस्लिम उमेदवार जिंकून आले. यातील केवळ एक भाजपाचा आहे. भाजपानं एकूण 6 मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तृणमूल काँग्रेसचे 5, काँग्रेसचे 4, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे प्रत्येकी 3, एमआयएमचे 2 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले. तर एलजेपी, एनसीपी, सीपीएम आणि एआययूडीएफच्या प्रत्येकी एका मुस्लिम उमेदवाराला निवडणूक जिंकण्यात यश आलं.
मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्येही भाजपा सुस्साट; 50 टक्क्यांहून अधिक जागा खिशात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 7:24 PM