ठाणे : शिवसेना आणि भाजपाची युती झाल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघात पुन्हा शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे; परंतु भाजपाच्या २३ नगरसेवकांनी त्यांच्या नावाला विरोध दर्शविला आहे. प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत हा विरोध मावळलेला असेल, असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. दुसरीकडे, लोकशाही आघाडीत अद्यापही उमेदवारीबाबत संभ्रम कायम असून, हा मतदारसंघ माजी मंत्री गणेश नाईक यांनी लढवावा, अशी इच्छा पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केली आहे; परंतु नाईक अद्याप इच्छुक नसल्याचे समजते.ठाणे लोकसभेतील तीन विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास येथील दोन मतदारसंघ शिवसेनेकडे असून, एक मतदार संघ भाजपाकडे आहे. नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ राष्ट्रवादीकडे, तर एक भाजपाकडे आहे. मीरा-भार्इंदर विधानसभा क्षेत्रावरही भाजपाचेच वर्चस्व असून, ही युतीसाठी जमेची बाजू मानली जात आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात मात्र केवळ ऐरोली हा एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे, त्यामुळेच नाईक कुटुंब ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे युतीचा बिगुल वाजला असला, तरी राजन विचारे यांच्या नावाला ठाण्यातील भाजपाच्या सर्वच्या सर्वच २३ नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे; परंतु इतर मतदारसंघांमध्ये शिवसेनेची मंडळी ज्याप्रमाणे भाजपाच्या उमेदवाराला विरोध करीत आहेत, त्याचप्रकारे ठाण्यात सेनेला भाजपाचा विरोध असल्याचे बोलले जात आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असली, तरी ठाणे, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबईत काँग्रेसचे दमदार अस्तित्व नाही. त्यामुळे निवडणुकीची खिंड राष्ट्रवादीला एकट्यानेच लढवावी लागणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत मनसेने या मतदारसंघात निवडणूक लढविली होती. यंदा निवडणूक लढवायची की नाही, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचा या मतदारसंघात फारसा प्रभाव नाही.राष्ट्रवादीचा एकच आमदार२०१४ नंतर झालेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत ठाणे महापालिकेत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली. भाजपाचे येथे २३ नगरसेवक आहेत. नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीची सत्ता आहे.आघाडीत असलेल्या काँग्रेसचे मीरा-भार्इंदरमध्ये १३, ठाण्यात दोन आणि नवी मुंबईत दहा नगरसेवक आहेत. त्यामुळे याचा आघाडीच्या उमेदवाराला कितपत फायदा होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Lok Sabha Election 2019: शिवसेनेच्या विचारेंना भाजपाचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 1:08 AM