महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत म्हणून कायदे केले; संकल्पपत्रात भाजपची गंभीर चूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 09:28 PM2019-04-08T21:28:42+5:302019-04-08T21:31:05+5:30
भाजपाच्या संकल्पपत्रातील चुकीचा काँग्रेसकडून समाचार
नवी दिल्ली: भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, जाहीरनामा समितीचे प्रमुख राजनाथ सिंह उपस्थित होते. यावेळी मोदींसह भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत सरकारनं केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत पुढील पाच वर्षांसाठीचं व्हिजन डॉक्युमेंट मांडलं. यामध्ये महिलांची सुरक्षा, त्यांच्यासाठी आरक्षण अशा मुद्द्यांचा समावेश आहे. मात्र यामध्ये भाजपानं गंभीर चूक केली आहे.
At least one point in BJP's manifesto reflects their true intentions. #BJPJumlaManifestopic.twitter.com/b5CqRrOz0E
— Congress (@INCIndia) April 8, 2019
भाजपानं संकल्पपत्राच्या 32 व्या पानावरील 11 व्या मुद्द्यात मोठी चूक केली. 'महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिलं जाईल. आम्ही गृह मंत्रालयात महिला सुरक्षा विभागाची स्थापना केली आहे. याशिवाय महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत यासाठी कठोर कायदे केले आहेत. त्यामुळे कमीतकमी वेळात तपास होतो आणि बलात्कारांसारख्या प्रकरणांमध्ये सुनावणी सुरू होते. अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्यक असणाऱ्या फॉरेन्सिक सुविधांमध्ये वाढ करण्यात येईल. यासोबतच न्याय देण्यासाठी जलदगती न्यायालयांचा विस्तार करण्यात येईल,' असं भाजपानं संकल्पपत्रात म्हटलं आहे.
महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत यासाठी कठोर कायदे केले आहेत, या वाक्यात गंभीर चूक आहे. महिलांविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे केले, असं वाक्य या ठिकाणी असायला हवं होतं. काँग्रेसनं भाजपाची ही चूक अधोरेखित करत संकल्पपत्राचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. भाजपाच्या किमान एका मुद्द्यामुळे तरी त्यांचा हेतू दिसून येतो, असं काँग्रेसनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच 29 व्या पानावर 'केंद्रीय विदयाललास आणि नवोदय विदायलास' असे शब्द आहेत. या ठिकाणी भाजपाला बहुधा केंद्रीय विद्यालयास आणि नवोदय विद्यालयास असे शब्द अभिप्रेत असावेत.