सेरामपूर: तृणमूलचे 40 आमदार संपर्कात असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल पश्चिम बंगालमध्ये जनसभेला संबोधित करताना केला. मोदींच्या या विधानाला तृणमूल काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं. एक्स्पायरी बाबू, तुमच्यासोबत 1 नगरसेवकदेखील जाणार नाही, अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी पंतप्रधानांवर पलटवार केला. त्यांनी मोदींवर घोडेबाजाराचादेखील आरोप केला. पंतप्रधान मोदींनी सेरामपूरमधील जनसभेत तृणमूलचे 40 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला. निवडणुकीनंतर तृणमूलचे अनेक आमदार पक्ष सोडणार असल्याचं मोदी जाहीर सभेत म्हणाले. मोदींच्या या विधानाला ओब्रायन यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिलं. 'कोणीही तुमच्या सोबत जाणार नाही. एक नगरसेवकदेखील जाणार नाही,' असं ओब्रायन यांनी ट्विटमध्ये म्हटलं. यात त्यांनी मोदींचा उल्लेख एक्स्पायरी बाबू असा केला. तुम्ही निवडणूक प्रचार करताय की घोडेबाजार, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. मोदींच्या विधानाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंदेखील ते म्हणाले.
निवडणूक प्रचार करताय की घोडेबाजार? तृणमूलचा मोदींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 7:59 AM